लोकसभा निवडणूक संपताच आता मनोज जरांगे पाटील हे ॲक्शन मोडवर आले आहेत. लोकसभा निकालाला अवघे काही तास बाकी आहेत. त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काही सूचना केल्या आहेत. उद्या निकाल आहे. कोणीही विजयी होऊ द्या. कोणीही पराभूत होऊ द्या. तुम्ही जल्लोष करू नका. फोटो पोस्ट करू नका. कुणाचाही जयजयकार करू नका. कुणाच्याही मिरवणुकीत जाऊ नका, असं फर्मानच मनोज जरांगे पाटील यांनी सोडलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या आदेशाने सत्ताधाऱ्यांनाच टेन्शन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आणि कायदा पारीत झाला पाहिजे. त्यासाठी मी 8 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे. कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे कायदा करायला किती दिवस पाहिजेत? सरकार काड्या करत आहे. षडयंत्र करत आहे. लोकांना फोडत आहे. गेले 10 महिने त्यांचे हे षडयंत्र सुरू आहे. मी समाजासाठी जीव द्यायला तयार आहे. आयाबहिणीचं रक्त सांडलंय. मी त्यांच्याशी कधीच बेईमान होणार नाही. पैसा आणि अमिषासाठी बेईमान होणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
आरक्षणाचा विषय सरकारने गोडीगुलाबीने हाताळावा. तुम्ही जर काड्या केल्या तर असा खुट्टा ठोकीन की तो ट्रॅक्टरनेही बाहेर काढता येणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत मी 288 मतदारसंघात सर्व जाती धर्माचे उमेदवार उभे करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माझी हात जोडून विनंती आहे की, राजकारण हा माझा मार्ग नाही. मला राजकारणाकडे ओढू नका. मला सग्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी हवी आहे, असं ते म्हणाले.
तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. आमचे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. बाकी आम्हाला काहीही घेणंदेणं नाही. तुम्ही आमच्याविरोधातील डाव बंद करा. तुमच्या दहा पिढ्या आल्या तरी हे आंदोलन हटणार नाही, असा इशारा देतानाच मराठा समाजाला विनंती आहे की, कोणी निवडून आले तर कोणी पोस्ट सुद्धा करायची नाही. जयजयकार ही करायचा नाही, कुणाच्या मिरवणुकीत जायचे नाही. मराठा समाजाने शांत रहायचे आहे, असं आवाहन त्यांनी केलं.
आताचं माझं उपोषण मी मरेपर्यंत चालेल. मी मागे हटणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कधीच शत्रू मानले नाही. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. नाही तर मराठा समाजाला मागणारा नव्हे तर देणारा समाज बनावे लागेल. अडथळे माझ्या पाचवीला पुजलेले आहेत. सरकार मला मारायला तयार असले तरी मी मरायला तयार आहे, असंही ते म्हणाले.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स