मुंबई उत्तर हा भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. भाजपाने या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना तिकीट दिलं होतं. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक रिंगणात होते. भाजपासाठी या मतदारसंघात जमेची बाजू म्हणजे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा तगडा जनसंर्पक नव्हतं. हीच गोष्ट भाजपाच्या पथ्यावर पडणारी होती. मराठी भाषिक मतदारांपेक्षा या मतदारसंघात अन्य भाषिक मतदारांची संख्या जास्त आहे. मागच्या दोन टर्मपासून भाजपाने या मतदारसंघात आरामात विजय मिळवलाय. उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव केला आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघात गुजराती, उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहेत. मराठी मतदारांपेक्षा त्यांचे प्रमाण जास्त आहे. गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार नेहमीच भाजपाच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यामुळे इथून भाजपा उमेदवाराने आरामात विजय मिळवला. बोरिवली, दहीसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून गोपाळ शेट्टी यांनी घवघवीत यश मिळवलय. एकदा शेट्टी यांनी काँग्रेसच्या उमदेवार उर्मिला मातोंडकर आणि त्याआधी संजय निरुपम यांच्यावर मोठा विजय मिळवला.
उमेदवाराचे नाव | आघाडी-पिछाडी | निकाल |
---|---|---|
पीयूष गोयल (भाजपा) | - | विजयी |
भूषण पाटील (काँग्रेस) | - | पराभूत |
पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा-शिवसेनेच वर्चस्व
बोरिवली, दहिसर, कांदिवली पूर्व आणि चारकोप या चार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. मागाठणेमधून शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत. फक्त मालाड पश्चिमेला काँग्रेसचे अस्लम शेख आमदार आहेत. म्हणजे पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा-शिवसेनेच वर्चस्व आहे. त्याच कारणामुळे पीयूष गोयल यांचा विजय सोपा मानला जातोय.