उद्या संध्याकाळी 6.30 वाजता दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये महत्त्वाची मिटिंग आहे. त्यामुळे उद्या सगळ्यांना दिल्लीला यायचं आहे. विशाल पाटील काल दिल्लीला जाऊन आले. तुम्हालाही निघायचं आहे. बॅगा भरून ठेवा, अशा सूचना देतानाच मात्र, ही बॅग कपड्यांची असावी, एकनाथ शिंदे यांच्या बॅगेसारखी नको, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधत असताना त्यांनी या सूचना केल्या आहेत.
आपल्या सर्वच्या सर्व 14 खासदारांचं मी अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी खासदार निवडून आणण्यात मदत केली त्यांचे आभार. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे देखील आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. महाराष्ट्रच्या जनतेचं देखील मी आभार व्यक्त करतो. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. त्यामुळे ही निवडणूक घराघरात पोहोचली. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष उभा राहिला, असं नाना पटोले म्हणाले.
आज देशाचं संविधान बदलण्याच काम सुरू होतं. ते आपण थांबवलं आहे. महाराष्ट्रातील जनतेने जो कौल दिला, त्यातून भाजपला सबक मिळाला आहे. ही लोकांची निवडणूक होती. या वेळेस सगळे काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले. सामूहिक विजयाचा हा उत्सव आहे. या सर्वांचं श्रेय राहुल गांधींना जातं, असंही ते पटोले म्हणाले.
आज राज्यात दुष्काळ आहे. काँग्रेसने लगेच एक समिती स्थापन केली. आम्ही राज्यभर फिरून आढावा घेत आहोत. सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. पण या सरकारला कशाचंही पडलेलं नाही. राज्यात खूप भयानक परिस्थिती आहे, असं त्यांनी सांगितलं.
या अडचणीच्या परिस्थितीत काँग्रेसने ही लढाई हिमतीने लढली. या विश्वासाला तडा आम्ही जाऊ देणार नाही. अमोल कीर्तिकर जिथे उभे होते, ती जागा आपली होती. वर्षा गायकवाड यांचीही जागा काढून घेतली. या दोन्ही जागा आम्हाला दिल्या असत्या तर महाविकास आघाडीचा फायदा झाला असता. पण हा लढा अजून संपलेला नाही. आपल्याला आता सुरुवात करायची आहे. ताकतीने विधानसभेला उतरायचं आहे. आता काँग्रेसचा पंजा सगळीकडे दिसला पाहिजे, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं.