उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे उज्ज्वल निकम आघाडीवर आहेत. उज्ज्वल निकम यांना आतापर्यंत ३७०९९६ मते मिळाली आहेत तर वर्षा गायकवाड यांना ३५१७५६ मते मिळाली आहेत. या मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यात लढत होत आहे. भाजपने यंदा पुनम महाजन यांचं तिकीट कापत उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवले आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जात होता. कारण येथून सुनिल दत्त हे प्रतिनिधीत्व करत होते. 2014 मध्ये सुनिल दत्त यांची मुलगी प्रिया दत्त यांना येथून पराभव सहन करावा लागला होता.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात यंदा 51.98 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार अशी चर्चा होती. मराठी मतदारांबरोबरच येथे दलीत आणि उत्तर भारतीय मतदारांची मोठी संख्या आहे. मुस्लीम मतदारही या मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावतात. शिवाय उत्तर भारतीय मतदार कोणाच्या पारड्यात मतं टाकणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे.
उज्वल निकम यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी येथे सभा घेतली होती. पण या मतदारसंघात चार लाखांपेक्षा अधिक मुस्लीम मतदार असल्याने विजय कुणाकडे जाणार अशी चर्चा होती. येथे काँग्रेस विरूद्ध भाजप अशी थेट लढत होती.
या मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील दोन भाजपच्या ताब्यात आहेत तर २ शिवसेना शिंदेगटाकडे आहेत. शिवसेना ठाकरेंकडे एक आमदार आहे तर काँग्रेसकडे एक आमदार आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे देखील राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे महायुतीचे पारडे जड वाटत होते.
सुनिल दत्त यांच्या निधनानंतर प्रिया दत्त या दोन वेळा येथून विजयी झाल्या होत्या. पण 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. पुनम महाजन यांनी येथून विजय मिळवला. 2019 मध्ये ही पुनम महाजन विजयी झाल्या होत्या.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स