सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरु आहेत. सात टप्प्यात मतदान होणार आहे. आतापर्यंत पाच टप्पे झाले आहेत. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये मुख्य सामना आहे. आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदानानंतर दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत. 4 जून नंतर आम्ही सरकार स्थापन करुन असा इंडिया आघाडीचा दावा आहे. त्याचवेळी आम्ही आताच बहुमताच्या 272 च्या आकड्याच्या पुढे आहोत, असा भाजपाकडून दावा करण्यात येतोय. त्यामुळे निकालाच्या आधीच लोकांची उत्सुक्ता वाढली आहे. पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणजे राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल काही अंदाज व्यक्त केले आहेत. प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांसाठी विधानसभा, लोकसभेला राजकीय व्युहरचना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 बद्दल काही अंदाज वर्तवले आहेत.
“लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून 400 पारचा नारा दिला जात आहे. पण प्रत्यक्षात भाजपाला 300 जागा मिळतील” असा प्रशांत किशोर यांचा अंदाज आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात व्यापक राग नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. “भाजपाला स्वबळावर 370 जागा मिळणं अशक्य आहे, पण त्यांना जवळपास 300 जागा मिळतील” असं प्रशांत किशोर म्हणाले. “ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भाजपाला 370 जागा मिळतील. एनडीए 400 पार जाईल, त्या दिवशी मी म्हणालो हे शक्य नाहीय. ही सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी घोषणाबाजी आहे. भाजपाला 370 चा आकडा गाठण शक्य नाहीय, पण ते 270 च्या खाली सुद्धा जाणार नाहीत” असं प्रशांत किशोर म्हणाले.
महाराष्ट्रात बाबत काय म्हणाले?
विरोधी पक्षाला असं वाटतय की ते महाराष्ट्रात 20-25 जागा जिंकतील. विरोधी पक्षाने 25 जागा जिंकल्या, तरी त्यामुळे भाजपाच काही विशेष नुकसान होणार नाही. वर्तमान स्थितीत, महाराष्ट्रात भाजपाकडे 48 पैकी 23 च खासदार आहेत. अशावेळी महाराष्ट्रात मविआने जास्त जागा जिंकल्या तरी त्यामुळे भाजपाला विशेष नुकसान होणार नाही.
यूपीबद्दल प्रशांत किशोर यांचा अंदाज काय?
2019 मध्ये यूपी आणि बिहारमध्ये मिळून भाजपाला लोकसभा निवडणुकीत 25 जागांच नुकसान झालं होतं. 2019 मध्ये सपा आणि बसपा एकत्र लढल्यामुळे भाजपाच्या जागा 73 वरुन 62 वर आल्या होत्या. विरोधी पक्षाच मत आहे की, यावेळी सुद्धा भाजपाला 20 जागांवर फटका बसेल. पण त्यामुळे भाजपाचा फार नुकसान होणार नाही. 2019 मध्ये भाजपाने 18 जागा गमावल्या पण बंगालमध्ये त्यांनी आपल्या जागा वाढवल्या या सर्व मुद्यांकडे प्रशांत किशोर यांनी लक्ष वेधलं.