माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस असल्याचं चित्र आहे. भाजप नेते धैर्यवर्धन मोहिते पाटील हे रणजितसिंह निंबाळकर यांच्या जागेवर उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण पक्षाने मोहिते पाटील यांना उमेदवारी न देता रणजितसिंह यांना पुन्हा संधी दिली. त्यामुळे धैर्यवर्धन मोहिते पाटील हे नाराज झाले आहेत. त्यांनी माढ्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठकादेखील घेतल्या आहेत. विशेष म्हणजे आता रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांनी भूमिका मांडली. त्यांचा आज फलटणमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात रामराजे निंबाळकर यांनी माढा मतदासंघासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा देण्यात आलेल्या उमेदवारीवर भूमिका मांडली.
भाजपने कुणालाही उमेदवारी द्यावी, पण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका रामराजे निंबाळकर यांनी मांडली. तसेच रणजितसिंह निंबाळकर यांनी आमची माफी मागावी, अशी भूमिका रामराजे निंबाळकर यांनी मांडली. तसेच उमेदवारी मिळाल्यावर उमेदवाराचा साधा फोनही आला नाही, अशीही खंत रामराजे निंबाळकर मांडली.
“अजित दादा म्हणाले की, कार्यकर्त्यांशी बोलून बघा, त्यांना शांत करा. पण माझ्या डोक्यात एक विचार आला आहे आणि हे फायनल आहे. आपण जे जे बोलले आहात हे नेत्यापर्यंत मीडियाने ऑलरेडी पोहोचवलेलं आहे. दुसरी गोष्ट आज फक्त फलटणचा प्रश्न नाही. खटाव, मानचा प्रश्न आहे. ठराविक लोकं घेऊन आपलं काय म्हणणं आहे हे फक्त अजित पवारांना आपण बोलून दाखवलं. तरी त्यांना भाजपचा उमेदवार ठेवायचा असेल मग मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाहीत हे स्पष्ट सांगून येऊ. त्यानंतर काय करायचं ते करा”, असं म्हणत रामराजे निंबाळकर यांनी दंड थोपटले.
“542 खासदार आहेत. एखाद दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलंय? यांना वाटतं की, आपण मोठे खासदार आहोत. काय करायचं आहे? यांच्याबद्दल किती बोलावं यालाच मर्यादा नाही. मला यांच्याविषयी बोलून कंटाळा आला. कुणी बारामतीचा विषय काढला. नीरा देवघरचा कार्यक्रम झाला. अहो, नीरा देवघरसाठी रात्री तीन-तीन वाजता पुनर्वसनाच्या बैठका घेतल्या म्हणून नीरा-देवघर झालं आणि 66 किमीपर्यंत खंडाळ्याला पाणी आलं”, असं रामराजे म्हणाले.
“बोलायलाही मर्यादा असतात. पण सर्व मीच केलं ही भावना यांची होत असेल. हे सद्गृस्थ साडेचार वर्ष कुठे होते? पालखी मार्ग हा फक्त माढापुरता मर्यादीत आहे का? पंढरपूरला चालू होतो आणि आळंदीला जातो. ते सर्व पैसे यांनी आणले? ठीक आहे यांनी आणले तर आणले. निदान नीट तरी घ्या. जाहीरातबाजीशिवाय ज्या गृहस्थाला लोकांविषयी प्रेम नाही, माणुसकी नाही अशा लोकांबरोबर राजकारण करणं हे माझ्या दृष्टीने अयोग्य आहे”, अशी भूमिका रामराजे निंबाळकर यांनी मांडली.