Sangli Loksabha election : ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीत उभी फूट पडताना दिसत आहे. सांगली दौऱ्यावर असलेल्या राऊतांनी काँग्रेसच्याच नेत्यांना घरी बसवण्याचा इशारा दिला. थेट सांगलीत जावून संजय राऊतांनी काँग्रेसला एकाचवेळी दोन इशारेच नाही तर थेट धमकी दिली आहे. सांगलीचा उमेदवार बदलणार नाही. आमची कोंडी केली तर महाराष्ट्रात तुमची कोंडी करुन घरी बसवणार असा दमच संजय राऊतांनी काँग्रेसला दिला आहे. राऊतांनी घरी बसवण्याचीच भाषा केली असं नाही तर सांगलीत काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही नौटंकी बंद करावी असं राऊत म्हणाले आहेत.
काँग्रेसचा दावा असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेस अजूनही ठाम असून मैत्रीपूर्ण लढतीसाठीही तयार आहे. त्यासाठी स्थानिक काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदमांनी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची भेट घेतली आणि त्यानंतर नागपुरात येवून कदमांनी काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथलांचीही भेट घेतली. सांगलीच्या जागेवरुन सोशल मीडियातही पोस्टर वॉर सुरु झालंय. चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगलीत आले होते.
एका पोस्टरमधून राऊतांना डिवचण्यात आलंय. या पोस्टरमध्ये काँग्रेसचा मजबूत हात दाखवलाय. काँग्रेसच्या दंडावर राऊत बोट ठेवत असून, चाचपणी दौरा असं संबोधण्यात आलं आहे.
काँग्रेसच्या हाताची तपासणी केल्यावर सांगली काँग्रेसचा फुगा कसा फुटला हे यातून दाखवण्यात आलंय आणि काँग्रेसला 2 पराभवांची आठवण करुन देण्यात आलीय. 2014 मध्ये केंद्रीय मंत्री असताना साडे 3 लाख मतांनी पराभव. 2019 मध्ये दीड लाख मतांनी पराभव.
ठाकरेंनी सांगलीतून उमेदवार दिला असला तरी काँग्रेस लढणारच असं वारंवार विश्वजित कदम सांगत आहेत. आता तर राऊतांनी विश्वजित कदमांवरच शंका उपस्थित करत, विशाल पाटलांच्या पायलटचं विमान गुजरातकडे जावू नये, असं टोला लगावला आहे.
राऊतांनी सांगलीसह भिवंडीच्या जागेवरुनही काँग्रेसच्या जखमेवर बोट ठेवलं आहे. भिवंडीत काँग्रेस नाही तर शरद पवार गटच जिंकेल हे आम्हीच सांगितल्याचं राऊत म्हणाले आहेत. भिवंडीवरही काँग्रेसचा दावा असताना, शरद पवार गटानं बाळ्या मामा म्हात्रेंची उमेदवारी जाहीर केली.
स्वत: उद्धव ठाकरे यांनीच चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं माघार घेवून बॅकफूटवर येण्याच्या स्थितीत ठाकरे गट नाही. मात्र काँग्रेसही ठाम असल्यानं सांगलीत, महाविकास आघाडीत उभी फूट पडताना दिसत आहे.