मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीत कल्याण लोकसभेचा समावेश नाही. ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत कल्याणच्या जागेचा उल्लेख नाही. भाजपकडून 24 जणांना उमेदवारी जाहीर झालीय. पण यामध्येही कल्याणच्या जागेचा उल्लेख नाही. सर्वच पक्षांकडून कल्याण लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. महायुतीत कल्याण लोकसभेच्या जागेसाठी रस्सीखेच सुरु आहे. असं असताना आता ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभेच्या जागेसाठी एका मातब्बर आणि स्थानिक पातळीवरच्या लोकप्रिय चेहऱ्याला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष भोईर हे इच्छुक असल्याची माहिती समोर येत होती. पण आता कल्याणमधील नामांकीत असलेलं एक नाव समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट कल्याण लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे नेते सुधीर पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. सुधीर पाटील हे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष वंडार पाटील यांचे चिरंजीव आहेत. वंडार पाटील यांची कल्याणमध्ये मोठी ताकद आहे. त्यांची कल्याणमधील नागरिकांमध्ये चांगली प्रतिमा आहे. याशिवाय त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे सुधीर पाटील यांना ठाकरे गटाची उमेदवारी मिळाली तर त्याचा आपोआप फायदा लोकसभा निवडणुकीत बघायला मिळू शकतो.
सुधीर पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद पवार गट ) ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. तसेच सरपंच, पंचायत समिती सदस्य अशा अनेक पदांचा पदभार त्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळला आहे. एक सुशिक्षित, युवा, कार्यक्षम, आगरी चेहरा, सामान्यांची जाण असणारे उमेदवार म्हणून सुधीर पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. सुधीर पाटील यांच्या नावाला प्रचंड लोकांची पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेची निवडणूक अतिशय लक्ष वेधणारी असणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर या मतदारसंघावर शिवसेनेची ताकद राहिली आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण या निवडणुकीत वातावरण वेगळं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ही जास्त रंगतदार होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाला कल्याणची जागा मिळते की नाही? याबाबतही साशंकता आहे. या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. त्यामुळे आता पुन्हा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळते की महायुतीत ही जागा भाजपच्या पदरात पडते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.