शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला सांभाळण्यात मोठं यश आलं आहे. मुंबईत 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. केवळ उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांचा विजय झाला आहे. उत्तर मुंबईची जागा वगळता मुंबईतील इतर सर्व जागा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली आहेत. विशेष म्हणजे उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स राहिला. अतिशय अटीतटीची लढत या ठिकाणी झाली. अखेर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला. तर भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला.
विशेष म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. आगामी काळात या निवडणुका लवकर होतात का? ते स्पष्ट होईल. पण मुंबई महापालिकेची निवडणूक न झाल्यामुळे मुंबईत कुणाची ताकद आहे? हे स्पष्ट होणं कठीण होतं. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मुंबईत नेमकी कोणत्या राजकीय पक्षाची ताकद आहे, हे निवडणुकीशिवाय समजणार नव्हतं. खरंतर मुंबई आणि शिवसेना यांचं एक वेगळं समीकरण राहिलेलं आहे. पण शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईत यश मिळतं का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मुंबईत शिवसेना पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणूक ही मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत ठाकरेंनी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाला चारी मुंड्या चित केलं आहे. मुंबईत एकूण सहा लोकसभेच्या जागा आहेत. या सहा पैकी 4 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार होते. या चारही जागांवर आपल्या उमेदवारांना विजयी करण्यात उद्धव ठाकरे यांना मोठं यश आलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर मुंबईच्या मतदारांनी मतदानातून प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेचे 40 आमदारांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचं बंड यशस्वी ठरल्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे खासदार फोडले होते. राहुल शेवाळे तब्बल 13 खासदार शिंदे गटात घेऊन गेले होते. विशेष म्हणजे त्यांनी लोकसभेचं गटनेतंपद मिळवून घेतलं होतं. तर भावना गवळी यांना मुख्य प्रतोद केलं होतं. राहुल शेवाळे हे कधीकाळी मुंबईत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना खासदारकीचं तिकीट देवून त्यांचं भवितव्य उज्ज्वल केलं होतं. पण नंतर घडलेल्या घडामोडींमध्ये शेवाळे यांनी ठाकरेंकडे पाठ फिरवली होती. या सर्व घडामोडींवर आता मतदारांनी मतदानातून प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स