लोकसभा निवडणूक निकालातील आतापर्यंतचे कल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. उत्तरप्रदेशच्या निकालाने अनेकांना चकीत केलं. 80 लोकसभेच्या जागा असलेल्या राज्यांमध्ये भाजपा 40 जागांपर्यंतही पोहोचू शकत नाहीये. तर इंडिया आघाडी 40 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवलं होतं. मात्र यंदा स्मृती इराणी हरताना दिसत आहेत. फक्त निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडा समोर येणं बाकी आहे. इराणींना काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी जोरदार टक्कर दिली आहे. स्मृती इराणींनी नुकतंच अमेठीमध्ये स्वत:चं घर बनवलं होतं. मात्र जनतेनं त्यांना त्याच मतदारसंघातून आता बेघर केलं आहे.
अमेठी लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी आणि भाजपच्या स्मृती इराणी यांच्यात टक्कर झाली होती. स्मृती इराणींनी राहुल यांना हरवत 2014 मध्ये झालेल्या पराभवाचा सूड घेतला होता. आता काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी त्यांना हरवत पुन्हा एकदा अमेठीची जागा आपल्याकडे घेतली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्मृती इराणींनी किशोरी लाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी किशोरी लाल शर्मा यांना ‘चौकीदार’ म्हटलं होतं. यंदा काँग्रेस अमेठीसोबतच रायबरेली मतदारसंघातूनही हरणार, असा विश्वास इराणींनी व्यक्त केला होता. राहुल गांधी यांनी रायबरेली या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी दिनेश प्रताप सिंह यांना हरवलं आहे.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचा ज्याप्रकारे परायज झाला, त्याची कोणी कल्पनाच केली नव्हती. विविध एजन्सींच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 68 जागा सांगितल्या गेल्या होत्या. तर इंडिया आघाडीला फक्त 12 जागा मिळणार असल्याचा अंदाज होता. मात्र निवडणुकीच्या निकालाने एक्झिट पोल्सना ‘फोल’ ठरवत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. दुसरीकडे समाजवादी पार्टीनेही या निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने पाच जागा जिंकल्या होत्या. यावेळी 34 जागांवर सपा आघाडीवर आहे.