ठाणे लोकसभा निकाल 2024 : ठाकरेंच्या निष्ठावंत उमेदवाराला शिंदेंच्या म्हस्केंचा दणका, तब्बल दीड लाखांची लीड

| Updated on: Jun 04, 2024 | 3:34 PM

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. या मतदारसंघात कुणाला विजय मिळणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार ठाण्यात शिंदेंच्या राजन विचारे यांनी ठाकरे गटाचे राजन विचारे यांना मोठा धक्का दिला आहे.

ठाणे लोकसभा निकाल 2024 : ठाकरेंच्या निष्ठावंत उमेदवाराला शिंदेंच्या म्हस्केंचा दणका, तब्बल दीड लाखांची लीड
राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के, कौल कुणाला?
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बालेकिल्ल्यात आपलं वर्चस्व राखण्यात यश मिळवताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदेंच्या उमेदवारांचा डंका दिसतोय. विशेष म्हणजे ठाण्यात मोठी उलटफेर होईल, या चर्चांमधील धूर निघाला आहे. कारण ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना मोठा धक्का मिळताना दिसतोय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना जवळपास दीड लाखांचं लीड मिळताना दिसत आहे. आतापर्यंत मतमोजणीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नरेश म्हस्के यांना 5 लाख 4 हजार 177 मतं मिळाली आहेत. तर राजन विचारे यांना 3 लाख 63 हजार 220 मतं मिळाल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे नरेश म्हस्के 1 लाख 40 हजार 957 मतांनी आघाडीवर आहेत.

शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजन विचारे यांना संधी दिली. तर दुसरीकडे महायुतीकडून ठाण्याची जागा ही शिंदे गटासाठी सुटली. शिंदे गटाने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत ठाण्यात बघायला मिळाली. या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण आता नरेश म्हस्के यांनी स्वत: ला सिद्ध करुन दाखवलं आहे. त्यांना तब्बल दीड लाख मतांचं लीड मिळताना दिसत आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय?

1984 मध्ये काँग्रेसचे शांताराम घोलप येथून खासदार झाले. भाजपचे राम कापसे 1989 आणि 1991 मध्ये दोनदा निवडून आले. 1996 नंतर ही जागा सलग 4 वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांच्या ताब्यात राहिली. त्यांच्या निधनानंतर 2008 मध्ये येथे पोटनिवडणूक झाली ज्यात त्यांचे पुत्र आनंद परांजपे विजयी झाले. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नायक विजयी झाले होते. मोदी लाटेत ही जागा भाजप-शिवसेना युतीकडे गेली. शिवसेनेचे राजन विचारे 2014 आणि 2019 मध्ये येथून खासदार म्हणून निवडून आले.

2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना 5,95,364 मते मिळाली होती. त्यांनी 2,81,299 मतांनी मोठा विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव गणेश नाईक यांचा पराभव केला. त्यांना केवळ 3,14,065 मते मिळाली. त्याच वेळी, 13,174 मतदारांनी NOTA बटण दाबले होते. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने राजन विचारे पुन्हा विजयी झाले, त्यांना 740,969 मते मिळाली. त्याचवेळी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ 3,28,824 मते मिळाली. राजन विचारे 4,12,145 मतांनी विजयी झाले.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर