लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायला अजून काही तास उरले आहेत. देशाचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. भाजप येणार की काँग्रेसचं कमबॅक होणार? याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे. तर आपलं काय होणार? अशी धाकधूक अनेक उमेदवारांच्या मनात निर्माण झाली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजामुळे तर काही उमेदवारांची झोपच उडाली आहे. अशी सर्व धाकधूक सुरू असतानाच काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणनेने एकच खळबळ उडाली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आमचा पराभव होत असेल तर मी राजकीय संन्यास घेईल, अशी घोषणाच विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विदर्भच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद होता. काँग्रेसचं वारं वाहत होतं. महाराष्ट्रातील किमान 35 जागा आम्ही जिंकत आहोत, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.
गेल्या आठवड्यापासून अनेक प्रसार माध्यमं सत्ताधाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक्झिट पोलमध्ये एनडीएचे 350 ते 375 जागा दाखवत आहेत. पण देशात मोदी सरकार विरोधात चीड होती. नागरिकांमध्ये मोठी नाराजी आणि संताप होता. त्यामुळेच मतदारांनी यंदा काँग्रेसला साथ दिली आहे. म्हणूनच आणच्या जागा अधिक निवडून येतील, असं वडेट्टीवार म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. पण निवडणूक आचारसंहिता असताना धार्मिक भाषणं करणाऱ्यांवर कारवाई झाली का? महाराष्ट्रात मतदान सुरू असताना बाजूच्या मतदारसंघात सभा घेतल्या, तो आचारसंहितेचा भंग झाला नाही का? त्यावर काही कारवाई केली का?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
देशाच्या सत्ता परिवर्तनासाठी काही तास शिल्लक बाकी आहेत. महाराष्ट्राचा निकाल स्पष्ट आहे. आम्ही 35 जागा जिंकत आहोत. एक्झिट पोल बोगस होते. सत्ताधाऱ्यांना खूश करण्यासाठीचे ते एक्झिट पोल आहेत. विदर्भात तर आमची लाट आहे. विदर्भातील 10 पैकी 10 जागा आम्ही जिंकत आहोत. विदर्भातील जनतेने सरकार विरोधात चिडून मतदान केलं आहे. सरकार विरोधात एवढं वातावरण असताना जर निकाल वेगळे लागले तर दाल में कुछ काला है असं समजावं, असं ते म्हणाले. इंडिया आघाडी देशात 295 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.