लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांनुसार भाजपा प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी यांच्यात चुरशीची लढत होताना दिसतेय. भाजपा 288 जागांवर आघाडीवर आहे. मात्र बहुमताचा आकडा गाठताना दोघांचीही दमछाक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या आधी संसदेत भाजपासाठी 370 जागा आणि एनडीएसाठी 400 जागा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये अंतरिम बजेट सादर झाला. लोकसभा निवडणूक निकालाचं आतापर्यंतच चित्र पाहता, भाजपला सर्वाधिक नुकसान उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सहन करावा लागतोय. आतापर्यंत उत्तर प्रदेशात भाजपा फक्त 35 जागांवर आघाडीवर आहे. स्मृती इराणी, अनुप्रिया पटेल आणि चंदौली इथून महेंद्रनाथ पांडेय यांसारखे नेते पिछाडीवर आहेत.
राजस्थानविषयी बोलायचं झाल्यास भाजपाने 2019 मध्ये जिथे क्लीन स्वीप केलं होतं, तिथे आतापर्यंत 14 जागांवरच आघाडीवर आहे. याठिकाणी काँग्रेसने आठ जागांवर आघाडी टिकवली आहे. बंगाल आणि बिहारमध्येही भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत आहेत. अशात प्रश्न हा आहे की अखेर भाजपाला उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांमध्ये कमी जागा का मिळत आहेत? यावर निवडणूक विश्लेषकांचं असं मत आहे की भाजपाला ‘400 पार’ या घोषणेमुळे खूप नुकसान झालं आहे. या घोषणेमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अति-आत्मविश्वास आला आणि मतदारांवर अधिकाधिक प्रभाव पाडण्यासाठी जास्त प्रयत्न केले नाहीत.
उत्तर प्रदेशात भाजपावर नजर ठेवणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की भाजपाने राज्यातील अधिकाधिक जागांवर पुन्हा त्याच उमेदवारांना संधी दिली. यामुळे त्यांना फटका बसला. सुल्तानपूरमध्ये मेनका गांधी, चंदौलीमध्ये महेंद्रनाथ पांडेय यांसारख्या नेत्यांबाबत स्थानिक लोकांनी तक्रार केली होती की ते मतदारसंघात फार क्वचित फेरफटका मारतात. स्थानिक स्तरावर विकासाची कामंसुद्धा कमी केली आहेत. हे दिल्लीच्या उदाहरणावरूनही समजलं जाऊ शकतं. भाजपाने दिल्लीमधील उत्तर पूर्व मतदारसंघाशिवाय सर्व जागांवरील उमेदवार बदलले गेले. यामुळे दिल्लीत त्यांना थेट फायदा झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे त्याच त्याच उमेदवारांना संधी दिल्याचंही एक फॅक्टर आहे.
मायावतीच्या पार्टीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 19 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवली होती आणि 10 जागा जिंकल्या होत्या. आतापर्यंतच्या कलांनुसार बसपा संपूर्ण उत्तर प्रदेशात शून्य आहे आणि टक्केवारीसुद्धा फक्त 9 च्या आसपास आहे. गेल्या निवडणुकीत सपाला 18 टक्के मतं मिळाली होती. ही टक्केवारी वाढून 31 टक्के झाली आहे. यामुळे हे स्पष्ट होतंय की बसपाची मतं यावेळी सपाच्या खात्यात गेली आहेत.