Maharashtra Elections : महायुतीत जागांचा तिढा संपला, पाहा कोण किती जागांवर लढणार?

| Updated on: Oct 19, 2024 | 9:15 PM

Maharashtra assembly election : दिल्लीत अमित शाहा यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक झाली. या बैठकीत महायुतीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. रात्री उशारापर्यंत झालेल्या बैठकीत काय ठरलंय जाणून घ्या.

Maharashtra Elections : महायुतीत जागांचा तिढा संपला, पाहा कोण किती जागांवर लढणार?
Follow us on

Maharashtra Assembly Election : दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत जागांचा तिढा जवळपास संपलेला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 155 जागा लढण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 78 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55 जागा मिळू शकतात, अशी माहिती आहे. तर ज्या मोजक्या जागांवर तिढा आहे, तो एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी बसून सोडवाव्यात अशा सूचना देण्यात आल्याचं कळतं आहे.

मुंबईतील एकूण 36 जागांचा तिढा मात्र पूर्णपणे सुटला आहे. मुंबईत महायुतीत भाजप 18 जागा, शिंदेंची शिवसेना 16 जागांवर लढू शकते. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झाल्यास, पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला वाद पाहता, तात्काळ दिल्लीतून सूत्र हललीत आणि काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर चेन्नीथलांनीही स्पष्ट केलं, की पटोलेंच्याच नेतृत्वात जागा वाटपाची बैठक होईल.

तर काँग्रेसच्या कार्यालयातही नाना पटोलेंच्या समर्थनात घोषणाबाजी झाली. महाराष्ट्र का सीएम कैसा हो, नाना पटोले जैसा हो, असा घोषणा पटोले समर्थकांनी दिल्या. चेन्नीथलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पुढच्या काही तासांत महाविकास आघाडीची बैठकही झाली आणि या बैठकीनंतर राऊत आणि पटोले पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी एकत्र आले आणि आपल्या देहबोलीतून सर्व काही आलबेल असल्याचं मीडियात कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला.

महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर मविआचे तिन्ही नेते जागा वाटपावर काही बोलले नाहीत. मात्र भाजपकडून मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंवर केला. प्रत्येक मतदारसंघात मुस्लीम आणि दलितांची 10 हजार मतं काढून बोगस मतं टाकली जात असल्याचा आरोप राऊत आणि पटोलेंनी केला आहे. राऊत आणि पटोले यांनी त्यासंदर्भात ई मेल द्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारही दिलीय.


महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाला जाहीर होणार आहे. त्यासाठी कधीही सगळ्याच पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते.