2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपने बऱ्याच जागा गमावल्या आहेत. दुसरीकडे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून गडकरी सध्या आघाडीवर आहेत. ते सध्या 70 हजार मतांनी पुढे आहेत. नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे मैदानात आहेत. नागपुरातून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पण जर भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तर मग नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
नितीन गडकरी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. नागपूर येथे संघाचे मुख्यालय आहे. त्याच नागपूरचं नितीन गडकरी प्रतिनिधित्व करतात हा देखील एक योगायोगच आहे. यंदा नितीन गडकरी यांनी कोणतेही पोस्टर न लावता प्रचार केला. नितीन गडकरी हे भाजपचे असे नेते आहेत ज्यांच्या नावाला काही विरोधी पक्षही पाठिंबा देऊ शकतात. जर नितीन गडकरी पंतप्रधान होत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील त्यांना पाठिंबा देऊ शकतो. निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी नितीन गडकरींच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. तिथे फडणवीसांनी योग्य तो पाठिंबा दिला नाही, असे राऊत म्हणाले होते. फडणवीसही नागपुरातून येतात. ते नागपूरचे आमदार आहेत.
2014 मध्ये नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींनी महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव केला. नितीन गडकरींनी 2.16 लाख मतांच्या फरकाने विजयी झाले. गडकरींसमोर आता सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याचे आव्हानच नाही, तर मताधिक्य वाढवण्याचेही आव्हान आहे. नितीन गडकरी निवडणुकीपूर्वी एका कार्यक्रमात म्हणाले की, काम करणाऱ्याचे नाव कमी आहे. त्यांनी अनेक वेळा विरोधकांच्या टाळ्या मिळवल्या आहेत.
भाजपचे नितीन गडकरी यांचा समावेश त्या नेत्यांमध्ये होतो ज्यांचं कौतूक विरोधक देखील करतात. अनेक विरोधी पक्षनेत्यांनी नितीन गडकरी यांचे खुलेपणाने कौतुक केले आहे. नितीन गडकरी हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. जर भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांनी कधीही अल्पमतातील सरकारचे नेतृत्व केले नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात अपेक्षित संख्याबळ न मिळाल्याने आरएसएस चिंतन करणार आहे. आता फक्त आरएसएस सक्रिय झाले असे नाही तर शरद पवारही सक्रिय झाले आहे. त्यांनी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना फोन केल्याची देखील माहिती आहे.