लुधियानाः पंजाबमधे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सुरक्षेत चूक ठेवल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, काँग्रेसने मात्र सोयीस्कर मौन बाळगले आहे. राहुल गांधी यांच्या चालत्या कारवर एका तरुणाने झेंडा फेकून मारला. तो राहुल यांच्या तोंडावर लागला. त्यानंतर राहुल यांनी तातडीने गाडीची खिडकी बंद केली. ही घटना रविवारी घडली. यामुळे काँग्रेस सरकारची फजिती होऊ नये म्हणून पक्षाच्या नेत्यांनी मूग गिळून बसणे पसंद केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. त्यांना भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी रस्तेमार्गे जायचे होते. सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे पोहचायचे होते. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे.
नेमके प्रकरण काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाबमधील लुधियाना येथे प्रचार फेरीसाठी गेले होते. प्रचारफेरी संपवून येताना त्यांची कार पंजाब काँग्रेसचे नेते सुनील जाखड चालवत होते. राहुल गांधी पुढच्या सीटवर बसले होते. मागच्या सीटवर मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू बसले होते. राहुल गांधी विमानतळावरून हॉटेलकडे निघाले. तेव्हा रस्त्यावरील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना हात दाखवायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचा नमस्कार स्वीकारण्यासाठी गाडीची काच खाली केली. नेमके त्याचवेळी कोणीतरी त्यांच्या कारवर झेंडा फेकला. हा झेंडा राहुल यांच्या तोंडावर लागला. त्यानंतर राहुल यांनी तातडीने काच बंद केली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली.
झेंडा फेकणारा कोण?
राहुल गांधी यांच्यावर झेंडा फेकणाऱ्या तरुणास लुधियानातील दाखा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव नदीम खान असल्याचे समजते. तो काँग्रेसच्या NSUI विद्यार्थी विंगचा कार्यकर्ता आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, मी राहुल गांधी यांना पाहून भावुक झालो. त्यामुळे उत्साहाच्या भरात हातातला झेंडा त्यांच्याकडे फेकला. तरुणाचा राहुल यांना धोका पोहचवायचा कोणताही उद्देश नव्हता. त्यामुळे याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली नाही आणि त्याच्यावर कसलिही कारवाई केली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या तरुणाची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले.
विरोधकांना संधी
पंजाबमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचे सरकार यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी ठेवल्याप्रकरणी चर्चेत आले होते. यावरून भाजपने सरकारला घेरले होते. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता काँग्रेसचे सरकार असणाऱ्या पंजाबमध्ये खुद्द काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे.
Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास
Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली