महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप जाहीर झालं. महाविकास आघाडीत ठाकरे गट 21, शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. यात भिवंडीची जागा शरद पवार गटच लढणार आहे. तर सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे. काँग्रेस पहिल्यांदाच सांगलीची जागा लढणार नाही. आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हे जागा वाटप करण्यात आलं. या जागा वाटपात शिवसेना मोठा भाऊ ठरला असून त्याखालोखाल काँग्रेसला जागा मिळाल्या आहेत. मात्र, या जागा वाटपात 10 जागा मिळवून शरद पवार गटानेही बाजी मारल्याचं दिसून आलं आहे.
महाविकास आघाडीची शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, संजय राऊत आदी उपस्थित होते.
शेकाप, आप, समाजवादी पार्टी, माकप, समाजवादी गणराज्य पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे. आंबेडकरी विचाराच्या अनेक संघटनाही आमच्यासोबत आल्या आहेत. त्या सर्वांची आघाडी झाली आहे. अनेकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. काही लोक आले. काही सोबत आले नाही. पण आम्ही आघाडी तयार केली आहे. आता आम्ही सर्व एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजप पक्ष हा भाकड आणि भेकड पक्ष आहे. विरोधकांवर धाडी मारून, कारवाया करून पक्ष वाढवणारा पक्ष भेकडच असतो. भाजप हा खंडणीखोरांचा पक्ष आहे. तसेच या पक्षाला एकही नेता निर्माण करता आला नाही. दुसऱ्या पक्षाचे नेते त्यांनी घेतले आहे. त्यामुळे त्या अर्थाने तो भाकड पक्ष आहे, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.
काल मोदी महाराष्ट्रात आले होते. काल दुर्मीळ योग होता. सूर्यग्रहण होते. अमावस्या होती आणि मोदींची सभा होती. अनेक वर्षानंतर असा दुर्मीळ योग आला. काल जे भाषण झालं. ते पंतप्रधानांचं नव्हतं. ते एका पक्षाच्या नेत्याचं भाषण होतं. त्यांनी आमच्यावर टीका केली. आता निवडणुका आहेत. त्यांनी एका पक्षाचा प्रचार करायला नको होता. उद्या आम्ही त्यांच्यावर टीका केली तर पंतप्रधानांवर टीका म्हणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि मुंबई उत्तर.
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड.
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य.