चेन्नई: तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत अनेक राजकीय पक्ष उतरले आहेत. एआयएडीएमके आणि डीएमके असतानाही अनेक छोटे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नाम तमिलर काची हा असाच एक पक्ष असून सध्या तामिळनाडूच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. या पक्षाचे नेते सेंथामिझन सीमान यांच्यामुळे हा पक्ष अधिक चर्चेत आहे. सीमान हे सिने दिग्दर्शक होते. परंतु, राजकारणात आल्यानंतर त्यांची तामिळनाडूचे ठाकरे अशी ओळख निर्माण झाली आहे. (Senthamizhan Seeman is a balasaheb thackeray Tamil Nadu)
सेंथामिझन सीमान यांचा पक्ष द्रविडीयन आंदोलनाशी संबंधित आहे. भूमिपुत्रांसाठी सीमान लढत असल्याने त्यांना तामिळनाडूचे ठाकरे म्हणून ओळखलं जातं. सीमान यांच्या नाम तमिलर काचीने 234 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यातही अर्धे तिकीट त्यांनी महिलांना दिले आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या पक्षाने उमेदवार उतरवले होते. त्यांनी कोणत्याच पक्षाशी आघाडी केली नव्हती. तरीही त्यांच्या पक्षाला 4 टक्के मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे डावे पक्ष आणि दलित पक्षांच्या एकत्रित मतांपेक्षाही सीमान यांच्या पक्षांची मतांची टक्केवारी अधिक होती.
एलटीटीईवरील हल्ल्यानंतर पक्षाची स्थापना
2009मध्ये सीमान यांनी त्यांच्या पक्षाची स्थापना केली. श्रीलंकेत एलटीटीईवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली होती. सीमान त्यांच्या भाषणात तामिळ संस्कृती आणि तामिळ म्हणून असलेल्या आयडेंटीटीवर अधिक भाष्य करतात. तामिळ लोकांनी आपलं मूळ ओळखलं पाहिजे. त्यांनी जुनी तामिळ संस्कृती आणि परंपरा मानली पाहिजे आणि तिचा प्रसार केला पाहिजे, असं ते भाषणात वारंवार सांगत असतात. तर सीमान हे तामिळ जनतेत फूट पाडण्याचं काम करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो.
निवडणुकीचा खर्च लोकवर्गणीतून
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार सीमान यांचे उमेदवार केवळ 2 ते 3 लाख रुपये निवडणुकीत खर्च करणार आहेत. लोकांकडून निधी गोळा करून हा पैसा जमा करण्यात आला आहे. त्यामुळे सीमान यांचे उमेदवार कमी खर्च करणार आहेत. लोक वर्गणीतूनच 15 लाख रुपये जमा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
50 टक्के महिलांना तिकीट
ज्या लोकांना राजकारणापासून दूर ठेवण्यात आलं होतं. त्यांनाच उमेदवार केल्याचं सीमान यांनी सांगितलं. माझे 50 टक्के उमेदवार या महिला आहेत. त्यात 13 मुस्लिम, 55 दलित आणि एक ब्राह्मण आहे. दरम्यान, सीमान यांच्या विचारधारेत खूप बदल झाला आहे. पूर्वी ते नास्तिक होते. नंतर ते पेरियार यांची विचारधारा मानू लागले. आता ते तामिल राष्ट्रीयतेवर बोलत असतात. पक्षाच्या पोस्टर्सवर त्यांच्या कपाळावर टिळा लागलेला असतो. त्यांनी केलेला मंदिरांचा दौरा खूप चर्चेत होता.
म्हणून तामिळनाडूतील ठाकरे म्हणतात…
तामिळ आयडेंटीटी निर्माण करण्याचा त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच त्यांना तामिळनाडूतील बाळासाहेब ठाकरे म्हटलं जातं. तुम्हाला तामिळनाडूचे बाळासाहेब ठाकरे म्हटलं जातं. त्याबद्दल काय वाटतं? असा सवाल त्यांना करण्यात आला. तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिलं. यात वाईट काय आहे. मला जर तामिळनाडूचे बाळासाहेब ठाकरे म्हटलं जातं, तर बाळासाहेबांनाही मराठा सीमान म्हटलं जाऊ शकतं, असं ते म्हणतात. तामिळ संस्कृती आणि ओळख यावर देशात खूपच उशिराने चर्चा सुरू झाल्याचंही ते म्हणतात. (Senthamizhan Seeman is a balasaheb thackeray Tamil Nadu)
तमिळ हिंदू नाहीत
तमिळ हिंदू नाहीत. हा विविधतेने नटलेला समाज आहे. तमिळ लोकांना हिंदुंशी जोडण्याचं काम ब्रिटीशांनी केलं आहे. मी नेहमीच पेरियार यांची विचारधारा मानत आलो आहे. त्यांच्याच मार्गाने जाण्याचा माझा प्रयत्न आहे. मी तमिळ जनतेचं नेतृत्व कायम करत राहिल. मला त्यांचं म्हणणं ऐकावं लागेल. त्यांच्या म्हणण्यानुसार मला मंदिरात जावं लागेल. मी देवाला मानत नाही. परंतु, देवासारखं काम करणाऱ्यांना मी मानतो, असं ते म्हणाले. (Senthamizhan Seeman is a balasaheb thackeray Tamil Nadu)
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 19 March 2021https://t.co/87shIouBPr
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 19, 2021
संबंधित बातम्या:
कमल हासनच्या पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अब्दुल कलामांच्या सल्लागाराला तिकीट
आसामच्या निवडणुकीतून CAA मुद्दा गायब?; वाचा, विरोधकांची खेळी आणि सत्ताधाऱ्यांचे डावपेच
(Senthamizhan Seeman is a balasaheb thackeray Tamil Nadu)