कोलकाता: ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील आमदार-खासदारांना फोडून त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून संख्याबळ वाढवण्याचा भाजपचा फॉर्म्युला बंगालच्या निवडणुकीत सपशेल फोल ठरला आहे. बंगालच्या निवडणुकीत मतदारांनी 16 दलबदलूंना नाकारले आहे. तसेच तीन खासदारांनाही पराभूत केले आहे. मतदारांनी आयाराम गयारामांना नाकारल्याने देशाचं राजकारणातही यापुढे हाच ट्रेंड येईल का? याची चर्चा सुरू झाली आहे. (TMC rebels get BJP tickets, lose to ex-party)
2016च्या निवडणुकीनंतर बंगालमध्ये टीएमसीला सोडून भाजपमध्ये जाणाऱ्यांचा ओघ सुरू झाला. या विधानसभा निवडणुकीपर्यंत हा ओघ सुरूच होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा फायदाही झाला. मात्र, काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं नुकसान झालं आहे. मतदारांनी या आयाराम गयारामांना सपशेल नाकारलं आहे. गेल्या दोन वर्षात टीएमसीचे किमान एक डझनहून अधिक आमदार आणि 30 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
8 आमदार, 16 नेते पराभूत
टीएमसीमधून आलेल्या या नेत्यांना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यापैकी 8 आमदारांसहीत 16 नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच टीएमसीतून आलेल्या अर्धा डझन नेत्यांना विधानसभा निवडणुकीत यशही मिळालं आहे. तसेच भाजपने चार खासदारांनाही विधानसभा निवडणुकीत उतरवलं होतं. त्यापैकी तिघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातील केवळ एकच खासदार विजयी झाला आहे.
तीन खासदार पराभूत
भाजपने चार विद्यमान खासदारांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. त्यापैकी लॉकेट चटर्जी चुंचुरा, स्वपन दास गुप्ता तारकेश्वर, बाबुल सुप्रियो टॉलिगंज विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. निसिथ प्रामाणिक हे दिनहाटा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे निसिथ हे आता खासदार म्हणून काम करणार की आमदार म्हणून सक्रिय राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीएमसीतून आले, पराभूत झाले
टीएमसी सोडून भाजपमध्ये आलेले राजीव बनर्जी हे दोमजूर विधानसभा मतदारसंघातून 43 हजार मतांनी पराभूत झाले. वैशाली डालमिया या सुद्धा बाली विधानसभा मतदारसंघातून सहा हजार मतांनी पराभूत झाल्या. तर सिंगूरमधून रवींद्रनाथ भट्टाचार्य यांचा 25 हजार मतांनी पराभव झाला आहे. कलनामधून विश्वजीत कुंडू यांचा 8 हजार मतांनी पराभूत झाले आहेत. डायमंड हार्बरमधून दीप हल्दर, शिलभद्र दत्ता, अरिंदम भट्टाचार्य, सब्यसाची गुप्ता आदींचा पराभव झाला आहे. हे सर्व नेते टीएमसी सोडून भाजपमध्ये आले होते. तसेच क्रिकेटपटू अशोक डिंडा, अभिनेत्री पायल सरकार, अभिनेता यश दासगुप्ता आणि माजी आयपीएस अधिकारी भारती घोष आदी दिग्गजही पराभूत झाले आहेत.
हे जिंकले
या निवडणुकीत काही आयाराम गयाराम विजयीही झाले आहेत. मुकुल रॉय, पार्थ चटर्जी, मिहिर गोस्वामी, जितेंद्र तिवारी आणि विश्वजीत दास बगदा आदींचा विजय झाला आहे. हे सर्व नेते टीएमसी सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते.
देशाचं राजकारण बदलतंय?
बंगालमधील नागरिकांनी भाजपला नाकारतानाच आयाराम गयारामांनाही नाकारलं आहे. त्यामुळे देशात सर्वच राज्यांमध्ये आयाराम गयारामांना नाकारण्याचा ट्रेंड सुरू होऊ शकतो, असं बोललं जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षात जाण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. केवळ निवडून येण्यासाठीच काही नेते पक्ष बदलतात. मात्र, बंगाली मतदारांनी या आयाराम गयारामांना नाकारून मोठा संदेश दिला आहे. त्यामुळे पक्षांतर करण्यापूर्वी आता इतर राज्यातील नेते हजारदा विचार करतील. बंगालचं हे उदाहरण हे नेते नक्कीच स्मरणात ठेवतील, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. (TMC rebels get BJP tickets, lose to ex-party)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 3 May 2021 https://t.co/oYApazg3GI #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2021
संबंधित बातम्या:
बंगालमधून डावे ‘लेफ्ट’ का झाले?, पराभवाची मुख्य कारणे; वाचा सविस्तर
आसाम, बंगालमध्ये पराभव, केरळही गेले; राहुल गांधी, प्रियांका समोरील आव्हाने वाढली?
निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपने 50चा आकडाही गाठला नसता: ममता बॅनर्जी
(TMC rebels get BJP tickets, lose to ex-party)