पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपची डोकेदुखी आता चांगलीच वाढणार आहे. कारण, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांनी आपण पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलीय. त्याचबरोबर आपण अन्य पक्षांच्या ऑफर स्वीकारणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर उत्पल यांनी पणजीतील जनतेला भावनिक आवाहनही केलं आहे.
भाजपने पणजी विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यास नकार दिल्यानंतर उत्पल पर्रिकर यांना आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपमध्ये प्रवेशाची ऑफर दिली होती. त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेत तर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी उत्पल यांनी या ऑफरबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी मी माझ्याच पक्षाच्या दुसऱ्या ऑफर स्वीकारल्या नाहीत, तर इतरांच्या ऑफर काय स्वीकारणार, असं उत्तर दिलं आहे.
I will be contesting as an Independent candidate from Panaji constituency: Utpal Parrikar, son of late former CM Manohar Parrikar#GoaElections pic.twitter.com/FsBomEeRwk
— ANI (@ANI) January 21, 2022
दरम्यान, पणजीऐवजी भाजपकडून उत्पल पर्रिकर यांना दोन मतदारसंघाची ऑफर देण्यात आली होती. तशी माहिती खुद्द गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीच दिली होती. त्यातील एका जागेबाबत उत्पल यांनी नकार दिलाय. तर दुसऱ्या जागेबाबत विचार सुरु असल्याचं फडणवीस त्यावेळी म्हणाले होते. तर उत्तर पर्रिकर यांना भाजपकडून कोणत्या दोन मतदारसंघाची ऑफर दिली गेली होती? असा प्रश्न विचारला जात होता. त्याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पल पर्रिकर यांना उत्तर गोव्यातील एक आणि दक्षिण गोव्यातील एक अशा दोन जागांची ऑफर देण्यात आली होती. उत्तर गोव्यातील सांताक्रूझ आणि दक्षिण गोव्यातील मडगाव या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पर्याय भाजपनं त्यांच्यासमोर ठेवला होता.
‘मतदारांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिलं होतं. कारण पर्रिकर हे मूल्यांच्या बाजूने होते. त्यामुळे मी या मुद्द्यांच्या बाजूने आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत मजबूत करायचा आहे. मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधी साधुला तिकीट दिलं आहे. दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे’, अशी मोठी घोषणा उत्पल पर्रीकर यांनी आज केलीय. ‘मी खूप मोठी रिस्क घेत आहे. मी फार कठीण मार्ग निवडला आहे. माझ्या करियरवर खूपजणांनी चिंता व्यक्त केली. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल’, असंही उत्पल पर्रीकर म्हणाले.
इतर बातम्या :