नवी दिल्लीः ज्या आमदारासोबत राहुल गांधी यांच्या लग्नाच्या वावड्या उठल्या. ज्या सोनिया गांधी यांचा रायबरेली मतदारसंघातून 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या. त्याच आमदार अदितीसिंह यांनी अखेर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चक्क भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा पदर पकडला. गेल्या कित्येक दिवसांपासून त्या काँग्रेसविरोधी वक्तव्याने प्रसिद्धीच्या झोतात होत्या. कोण आहेत या उत्तर प्रदेशातल्या तरुण आमदार अदितीसिंह. जाणून घेऊयात.
वडील काँग्रेसचे दिग्गज नेते
अदित सिंह या मूळ लखनौच्या आहेत. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1987 चा. त्यांचे वडील अखिलेश सिंह काँग्रेसचे दिग्गज नेते. त्यांची उत्तर प्रदेशात बाहुबली नेता म्हणून ओळख होती. अखिलेश सिंह यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले. ते रायबरेली मतदार संघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
तरुण आमदार ही ओळख
खरे तर 2017 सालापासूनच अदिती सिंह यांनी वडील अखिलेश सिंह यांचे राजकारण सांभाळायला सुरुवात केली. त्यांनी रायबरेली मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवली. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार शहबाज खान यांना तब्बल 90 हजार मतांनी धूळ चारत पराभव केला. अदिती सिंह यांची उत्तर प्रदेश विधानसभेतील सर्वात तरुण आमदार ही ओळख आहे.
पती काँग्रेसचे आमदार
अदिती सिंह यांचे शिक्षण परदेशात झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी 21 नोव्हेंबर 2019 रोजी पंजाब काँग्रेसचे आमदार अंगद सिंह यांच्यासोबत लग्न केले. त्यांच्या राहुल गांधी यांच्यासोबतच्या लग्नाच्या वावड्या यापूर्वी उठल्या. त्यामुळे त्यांच्यावर माध्यमांची नजर असायची. त्या नेहमी चर्चेत असायच्या. मात्र, त्यांनी अखेर ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
म्हणे 44 लाखांचे कर्ज
अदिती सिंह यांच्याकडे म्हणे फक्त 15 लाखांची संपत्ती आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या खात्यावर 53 हजार रुपये होते. दागिने म्हणाल तर फक्त 4 लाख 25 रुपयांचे. त्यांच्यावर नावावर एक शेत आहे. त्याची किंमत 4 लाख 40 हजार सांगितलीय. त्यांच्या नावावर एकही वाहन नाही. शिवाय त्यांच्यावर 44 लाख 90 हजार 234 रुपयांचे कर्जही आहे.