नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या विधानसभा मतदारसंघातून लढणार नाहीत. आदित्यनाथ यांना गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील 105 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपने पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 57 जागेवरील उमेदवारांची आणि दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांपैकी 48 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. सीएम योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
भाजपने पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह यांनाही तिकीट दिलं आहे. या शिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह यांनाही निवडणुकीचं तिकीट दिलं आहे.
योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून मैदानात उतरवले जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यांना गोरखपूर शहरमधून मैदानात उतरवण्यात आलं आहे. अयोध्येतून योगींना तिकीट देऊन भाजपला संपूर्ण राज्यात मेसेज द्यायचा होता. योगी आदित्यनाथ अयोध्येतून उभे राहिले असते तर त्यांनी किमान 60 जागांवर प्रभाव पाडला असता असं सांगितलं जातं. मात्र, योगी हे गोरखपूरचे असल्याने त्यांनी होमपीचवरून निवडणूक लढवण्यावर प्राधान्य दिल्याचं सांगितलं जात आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्यही सिराथूमधून लढतील असं सांगितलं जात होतं. त्यांच्या एका निकटवर्तीय नेत्याला सिराथू मतदारसंघाचा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार मोर्य यांना सिराथूमधून तिकीट देण्यात आलं आहे.
यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी योगी आदित्यनाथ सरकारचं तोंडभरून कौतुक केलं. योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात उत्तर प्रदेश दंगामुक्त झाला. राज्यात रुग्णालये आणि शाळा सुरू झाल्या. राज्यात एक्सप्रेस वे सुरू झाले. उत्तर प्रदेशात सर्वात मोठं विमानतळ तयार होत आहे, असं प्रधान म्हणाले.
शामली- तजेंद्र सिंह निर्वाल
बुढ़ाना- उमेश मलिक
चरथावल- सपना कश्यप
पूरकाजी- प्रमोद ओटवाल
मुजफ्फरनगर- कपिल देव अग्रवाल
खतौली- विक्रम सैनी
मीरापूर- प्रशांत गुर्जर
सिवालखास- मनेंद्र पाल सिंह
सरदना- संगीत सोम
हस्तिनापूर- दिनेश खटीक
मेरठ कँट- अमित अग्रवाल
किठोर- सत्यवीर त्यागी
मेरठ- कमलदत शर्मा
मेरठ साउथ- सोमेंदर तोमर
छपरउली- सहेंद्र सिंह रमाला
बड़ोत- केपी सिंह मलिक
बागपत- योगेश धामा
लोनी- नंदकिशोर गुर्जर
मुरादनगर-अजीत पाल त्यागी
साहिबाबाद- सुनील शर्मा
उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 15 January 2022 pic.twitter.com/6meeifw1kK
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2022
संबंधित बातम्या:
Assembly Elections 2022: निवडणूक रॅली, सभांवरील मनाई कायम राहणार?; आज निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा