उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शुक्रवारी त्यांनी गोरखपूरमधून उमेदवारी अर्ज (Election form) दाखल केला. उमेदवारी अर्जादरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशीलही दिला आहे. यामध्ये त्यांनी 1.54 कोटी रुपयांची संपत्ती (Property) असल्याचे सांगितले आहे. सीएम योगी यांनी आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 1 कोटी 54 लाख 94 हजार 54 रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये 1 लाख रोख आहे. यापूर्वी 2017 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांनी आपली संपत्ती 95.98 लाख रुपये असल्याचे जाहीर केले होते. 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत सुमारे 60 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
योगींच्या सपत्तीत काय काय?
सीएम योगी यांची दिल्ली, लखनौ आणि गोरखपूरमधील 6 ठिकाणी वेगवेगळ्या बँकांमध्ये 11 खाती आहेत. या खात्यांमध्ये 1 कोटी 13 लाख 75 हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे. सीएम योगी यांच्याकडे जमीन किंवा घर नाही. परंतु राष्ट्रीय बचत योजना आणि विमा पॉलिसींद्वारे त्यांच्याकडे 37.57 लाख रुपये आहेत. योगी आदित्यनाथ यांच्याकडे 49 हजार रुपयांची सोन्याचे कुंडल आहे. त्यांचे वजन 20 ग्रॅम आहे. तसेच योगींनी सोन्याच्या साखळीत रुद्राक्षाची माळ घातली, ज्याची किंमत 20 हजार रुपये आहे. या साखळीचे वजन 10 ग्रॅम आहे. सीएम योगी यांच्याकडे 12 हजार रुपयांचा मोबाईलही आहे. गेल्या वेळी योगींनी सांगितले होते की, त्यांच्याकडे दोन कार आहेत, पण यावेळी त्यांच्याकडे एकही कार नाही.
योगी हत्यारही बाळगतात
योगी सोबत शस्त्रेही ठेवतात. त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 80 हजार रुपये किमतीची रायफल आहे. योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 5 जून 1972 रोजी जन्मलेल्या योगी आदित्यनाथ यांनी वयाच्या 26 व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली होती. योगी यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा गोरखपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये ते सलग 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले. योगी आदित्यनाथ 2017 मध्ये यूपीचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. यानंतर त्यांची विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली.