ज्या निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा गाजला त्याच अयोध्येत भाजपला पराभवाचा धक्का

| Updated on: Jun 04, 2024 | 6:08 PM

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडे राम मंदिराचा मुद्दा होता. पण हा मुद्दा भाजपसाठी विजयी करणारा ठरला नाही. कारण या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. राम मंदिराचा मुद्दा गाजला पण जेथे राम मंदिर आहे त्याच अयोध्येत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे,

ज्या निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा गाजला त्याच अयोध्येत भाजपला पराभवाचा धक्का
Follow us on

लोकसभा निवडणुकीचे निकाल आता  हळूहळू स्पष्ट होत आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीएला 300 ते 350 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तवली गेली होती. पण आता भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे 10 वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा इतर पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 400 पार करण्याचा नारा देणाऱ्या भाजपला यावेळी पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाहीये.

राम मंदिराचा मुद्यावर मतदान नाही

भाजपकडे राम मंदिर हा या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा होता. पण या मुद्दयावर त्यांना मते मिळालेली दिसत नाहीयेत. भाजपने राम मंदिरावरुन जोरदार वातावरण निर्माण केले होते. प्रत्येक भाषणात राम मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता. पण उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी देखील ही आत्मचिंतनाची निवडणूक ठरली आहे. कारण अयोध्येतच भाजपचा मोठा पराभव झाला आहे.

फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपचे लल्लू सिंह यांचा सपाचे अवधेश प्रसाद यांनी पराभव केलाय. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात अयोध्या येते. या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हा संपूर्ण सोहळा पार पडला. परंतू लोकसभा निवडणुकीत याचा फायदा मिळवण्यात भाजप अपयशी ठरली. विरोधी पक्षांनी राम मंदिराच्या या सोहळ्याला भाजपचा कार्यक्रमाला म्हणत स्वतःला दूर केले होते.

विरोधकांवर केली होती टीका

विरोधकांच्या या भूमिकेवर भाजपने टीका केली होती. योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी यांनी देखील विरोधकांवर जोरदार टीका केली होती. आपल्या भाषणात लोकांना मतदान करण्याचे आवाहन करताना योगी म्हणाले की, ज्यांनी राम आणला त्यांनाच यूपीची जनता सत्तेत आणेल. राममंदिराच्या मुद्द्याचे भांडवल करण्यासाठी पक्षाने सर्वतोपरी प्रयत्न केले. जानेवारी 2024 मध्ये अभिषेक झाल्यानंतर, भाजपशासित राज्यांचे मंत्री आणि मुख्यमंत्री सातत्याने राम मंदिराला भेट देत आहेत जेणेकरून राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीपर्यंत तापत राहील. मात्र, आता निकाल पाहता भाजपचे हे धोरण अयोध्येतील जनतेला पसंत पडले नसल्याचे दिसून येत आहे.

राम मंदिर असलेल्या उत्तर प्रदेशातील अयोध्येत भाजप उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. अयोध्येतील विमानतळापासून विकासापर्यंत सर्व काही केल्याचा योगी सरकारचा दावाही फोल ठरला आणि सपाने राज्यातील ही सर्वात लोकप्रिय जागा जिंकली.