चेन्नई: तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्षांकडून तामिळनाडूच्या जनतेवर आश्वासनांची बरसात करण्यात येत आहे. द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनीही राज्यात सत्ता आल्यास सीएए कायदा लागू केला जाणार नाही तसेच कृषी कायद्यांचीही अंमलबजावणी करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अण्णाद्रमुक आणि पीएमकेच्यामुळे लोकसभेत सीएए आणि कृषी विधेयक मंजूर करण्यात आल्याचंही स्टॅलिन यांनी सांगितलं. (Will not allow CAA in Tamil Nadu after coming to power: MK Stalin)
तिरुपत्थूर येथे एका रॅलीला संबोधित करताना स्टॅलिन यांनी कृषी कायदा आणि सीएएबाबतची पक्षाची भूमिका स्पष्ट केली. लोकसभेत 125 खासदारांनी सीएए कायद्याला पाठिंबा दिला होता. काँग्रेस आणि डीएमकेसहीत 105 खासदार या विधेयकाच्या विरोधात होते. जर एआयएडीएमके आणि पीएमकेच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं असतं तर हा कायदा कधीच मंजूर झाला नसता. त्यामुळे हा कायदा मंजूर होण्यास मी एआयएडीएमके आणि पीएमकेला दोषी मानतो. या दोन पक्षांच्या या कृत्यामुळेच अल्पसंख्याकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
एआयएडीएमकेचं आश्वासन
सीएएला पाठिंबा दिल्यानंतर एआयएडीएमकेने आता त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सीएए कायदा मागे घेण्यासाठी भाजपवर दबाव आणणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. यावरून या पक्षाच्या हेतू समजून येतो. एआयएडीएमकेने राज्यात तीन कृषी कायदे लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे. हे सर्व कायदे म्हणजे शेतकऱ्यांची बर्बादी आहे, अशी टीकाही स्टॅलिन यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी असं काही केलं का?
पंजाब, केरळ आणि पश्चिम बंगालने या तिन्ही कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव मंजूर केला आहे. मुख्यमंत्री ई. पलानीसामींनी असं केलं काय? आमचं सरकार आलं तर सर्वात आधी आम्ही कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव मंजूर करू, हे आमचं आश्वासन आहे, असंही ते म्हणाले.
तामिळनाडूत 6 एप्रिल रोजी मतदान
तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी येत्या 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तामिळनाडूत बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. 2016मध्ये एआयएडीएमकेने 134 जागा जिंकल्या होत्या. तर डीएमकेने 97 जागा जिंकल्या होत्या. (Will not allow CAA in Tamil Nadu after coming to power: MK Stalin)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/qJ3huyGgHi
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2021
संबंधित बातम्या:
गोहत्या, सीएए… जसं राज्य तसा सूर; भाजपची दुहेरी चाल!
(Will not allow CAA in Tamil Nadu after coming to power: MK Stalin)