आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे गायक केके (KK Passes Away) यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व हादरलंय. कोलकातामधील (Kolkata) लाईव्ह शोदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. कार्डिॲक अरेस्टने (Cardiac Arrest) केके यांचं निधन झाल्याचं म्हटलं जातंय. मात्र त्याचसोबत या कार्यक्रमातील काही व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कार्यक्रमाच्या हॉलची क्षमता, तिथला एसी, बंदिस्त हॉलमधील ऑक्सिजन लेव्हल या सर्व गोष्टींचा उल्लेख केला जातोय. कार्डिॲक अरेस्टसाठी लाइफस्टाइल जरी कारणीभूत मानलं तरी केके हे दारू आणि सिगारेटच्या व्यसनापासून कायम दूर असायचे. मग अशी इतर काय कारणं होती, ज्यामुळे केके यांना त्या कार्यक्रमादरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागलं, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..
मंगळवारी केके ज्या नजरुल मंच इथल्या हॉलमध्ये परफॉर्म करत होते, तो हॉल प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. मुळात त्या हॉलची क्षमता ही 2700 लोकांची होती. प्रत्यक्षात तिथे जवळपास 7000 प्रेक्षक उपस्थित होते. कॉलेजचा कार्यक्रम असल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर तिथे हजर होते. हॉलमध्ये बसायलाही धड जागा नसताना अनेकजण खुर्च्यांवर उभे होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या स्थळावरून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजप आणि काँग्रेसने याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मंत्री फिरहाद हकिम यांनीसुद्धा याचा स्वीकार केला की कार्यक्रमात प्रमाणापेक्षा अधिक गर्दी जमली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी अखेर त्यांना अग्नीरोधकचा वापर करावा लागला.
प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या हॉलमध्ये केके हे एकानंतर एक गाणी सादर करत होते. परफॉर्म करताना त्यांना खूप घामसुद्धा येत होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ते वारंवार रुमालाने चेहरा पुसताना दिसत आहेत. सतत पाणी पिताना दिसत आहेत. दुसर्या व्हिडिओमध्ये केके एसीबद्दल तक्रार करतानाही दिसत आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या व्यवस्थापकांवर सुविधा दिल्या नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. “जेव्हा असे मोठे सेलिब्रिटी कार्यक्रमासाठी येतात तेव्हा गैरव्यवस्थापनाच्या घटना समोर येतात. पण त्यांना संरक्षण देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. इतक्या गरमीच्या वातावरणात एसी बंद झाल्यानंतर हॉलमधील परिस्थितीची तुम्ही फक्त कल्पनाच करू शकता,” असं बंगालचे भाजप खासदार दिलीप घोष म्हणाले.
केके यांचा कॉन्सर्ट ज्याठिकाणी पार पडला, तो नजरुल मंच हा ओपन ऑडिटोरियम नव्हता. बंदिस्त हॉल असल्याने हवा खेळती राहण्यासाठी काही पर्यायच नव्हता. त्यातही हॉलचा एसी बंद होता. अशा वेळी कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी केलेल्या धूम्रपानाचा धूर, गर्दी पांगवण्यासाठी केलेला अग्निशामक फोमचा वापर यांमुळे श्वसनाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. दिल्लीतील राजीव गांधी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचे एचओडी डॉ. अजित जैन याविषयी म्हणाली, “केके हॉटेलमध्ये आल्यानंतर बेशुद्ध झाले. याचा अर्थ त्यांना वेंट्रिकुलर फिब्रिलेशन झाला असावा. ही एक अशी स्थिती आहे, ज्यात हृदयाचे ठोके वाढतात आणि अनियमित होतात. यामुळे रक्तदाब कमी जास्त होऊन तो व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो.”
कोलकातामधल्या नजरुल मंच इथल्या हॉलची क्षमता ही 2700 इतकी आहे. तरीसुद्धा याठिकाणी कॉन्सर्टसाठी जवळपास 7000 लोक उपस्थित होते. बंदिस्त हॉलमध्ये या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. बंदिस्त हॉल, प्रमाणापेक्षा अधिक लोकांची क्षमता, निकामी एसी या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधलं जात असून ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका बंदिस्त हॉलमध्ये इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित असताना प्रशासनाने कारवाई का केली नाही, असा सवाल नेटकरी करत आहेत.
कॉन्सर्ट किंवा एखादा मोठा कार्यक्रम असल्यास, त्याठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्याची जबाबदारी ही व्यवस्थापकांची असते. मात्र केके यांना कार्यक्रमादरम्यान जेव्हा अस्वस्थ वाटू लागलं तेव्हा त्यांना आधी थेट हॉटेलमध्ये नेण्यात आलं. तिथे ते बेशुद्ध झाले आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. जर कॉन्सर्टच्या ठिकाणी तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली असती तर कदाचित केके यांचे प्राण वाचू शकले असते.
या सर्व मुद्द्यांवरून आता विरोधकांनी पश्चिम बंगालच्या प्रशासनाला चौफेर घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपने याप्रकरणी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर आरोप करत निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणी केली आहे.