मुंबई- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेते बबलू पृथ्वीराज यांच्या लग्नाच्या वृत्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 33 वर्षे लहान असलेल्या तरुणीशी गुपचूप दुसरं लग्न केलं अशी चर्चा होती. सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा झाली. आता बबलू पृथ्वीराज यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत 56 वर्षीय बबलू पृथ्वीराज यांनी 23 वर्षीय मुलीशी लग्न केल्याची कबुली दिली. जर मी 23 वर्षीय मुलीशी लग्न केलं तर त्यात चुकीचं काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी काहीच चुकीचं केलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बबलू यांचा पहिल्या पत्नीशी सहा वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला होता. तीन महिन्यांपूर्वी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली होती.
बबलू यांनी आता शीतल नावाच्या तरुणीशी लग्न केलं आहे. शीतल अत्यंत समजूतदार आहे आणि तिने आपली खूप साथ दिली, असं बबलू म्हणाले.
IndiaGlitz ला दिलेल्या मुलाखतीत बबलू पृथ्वीराज म्हणाले, “यात चुकीचं काहीच नाही. एकटेपणा हा सर्वांत मोठा अभिशाप आहे. शीतल तिच्या वयोमानापेक्षा खूप समजूतदार आहे. तिच्याशी लग्न करून मी खूप खुश आहे. सिनेमा, संगीत, हेल्थ, लाइफस्टाइल या सर्व गोष्टींच्या बाबतीत आमची आवड-निवड सारखीच आहे. आम्ही गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखतोय. ती जेवणसुद्धा चांगलं बनवते. मी फिट आहे. शीतलला माझ्या वयाविषयीची माहिती आहे. तिच्या कुटुंबीयांना सर्व गोष्टी माहीत आहेत. यात वाईट काय आहे?”
बबलू यांच्याविषयी शीतल म्हणाली, “ते अभिनेते आहेत हे मला आधी माहीत नव्हतं. त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतर मला त्यांच्या चित्रपटांविषयी समजलं. मी त्यांची एक मुलाखत पाहिली, त्यानंतर मला त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी समजल्या.”
बबलू पृथ्वीराज यांचं पहिलं लग्न 1994 मध्ये झालं होतं. त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं नाव बीना आहे. या दोघांना 27 वर्षीय मुलगा असल्याचं म्हटलं जातं.
बबलू पृथ्वीराज हे तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठे अभिनेते आहेत. खलनायकी भूमिकांसाठी ते विशेष लोकप्रिय आहेत. 56 वर्षीय बबलू हे फिटनेस फ्रीक आहेत. शीतलसोबत ते इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत असतात.