National Film Awards: आज, शुक्रवार (22 जुलै) 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards) घोषणा होणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे (Ministry of Information and Broadcasting) आज दुपारी हे पुरस्कार जाहीर होणार आहेत. या पुरस्कारांची घोषणा तसेच पुरस्कार सोहळ्याचे आयोजन या सर्वांची जबाबदारी डायरेक्ट्रेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल (DFF) या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या एका शाखेवर सोपवलेली असते. गेल्या वर्षी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने अभिनय केलेल्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला होता. तर अभिनेता मनोज वाजपेयी व धनुष यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री कंगना राणौत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र हे पुरस्कार नेमके का दिले जातात, त्याची सुरुवात कधी आणि कशी झाली होती, या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ? जाणून घेऊया त्याबद्दलची माहिती..
कला, संस्कृती, सिनेमा आणि साहित्य या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मानार्थ हे पुरस्कार दिले जातात. स्वातंत्र्यानंतर देशातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांची सुरूवात झाली होती. चांगले चित्रपट तयार व्हावेत, चांगल्या कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, हाच या पुरस्कारांमागचा हेतू आहे.
या पुरस्कारांची सुरुवात करण्यासाठी 1949 साली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. शिक्षण आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित बनलेल्याा सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड करणे, हे या समितीचे काम होते. 1954 साली राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली होती. 1953 साली बनलेल्या काही उत्तम चित्रपटांची त्यासाठी निवड करण्यात आली होती. पहिल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्ण कमळ ‘श्यामची आई’ या चित्रपटाला देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. तर महाबलीपुरम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वृत्तचित्राचा (Documentary film) पुरस्कार मिळाला होता. दो बिघा जमीन हा हिंदी चित्रपट, भगवान श्रीकृष्ण चैतन्य हा बंगाली चित्रपट आणि लहान मुलांसाठी बनलेला खेला घर या चित्रपटांनाही प्रमाण पत्र देण्यात आले होते.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रत्येक विभागासाठी वेगळा पुरस्कार दिला जातो. रौप्य कमळ, सुवर्ण कमळ अशी त्यांची नावे आहेत. काही पुरस्कारात रोख रक्कम दिली जाते, तर काहींमध्ये केवळ मेडल दिले जाते. दादसाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना सुवर्ण कमळ, 10 लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि शाल प्रदान केली जाते. तर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार ज्यांना मिळतो, त्यांना सुवर्ण कमळ आणि अडीच लाख रुपयांची रक्कम प्रदान करण्यात येते. बऱ्याच विभागांमध्ये रौप्य कमळ व दीड लाख रुपयांची रक्कम, पुरस्कारार्थ देण्यात येते.
सामान्यत: हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. मात्र काही वर्षांपासून हे पुरस्कार उपराष्ट्रपती अथवा माहिती व प्रसारण मंत्री यांच्या हस्ते दिले जात आहेत. 2021 साली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले होते.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्याकडे सर्वात जास्त राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. तब्बल 5 वेळा हा पुरस्कार जिंकून शबाना आझमी पहिल्या स्थानावर आहेत. . अंकुर, अर्थ, खंडहर, पार आणि गॉडमदर या चित्रपटातील सर्वोत्तम अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तर अभिनयाचे शहेनशहा, बिग बी अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन यांना 4 वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. अग्निपथ, ब्लॅक, पा आणि पिकू या चित्रपटांसाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला तर आपल्या दमदार अभिनयासोबतच अनेक विधानांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणौत हिनेही 4 वेळा या पुरस्कारावर तिचे नाव कोरले आहे. फॅशन, क्वीन, तनु वेड्स मनु आणि मणिकर्णिका या चित्रपटातील कामगिरीसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते कमल हासन, पंकज कपूर, नाना पाटेकर, मिथुन चक्रवर्ती आणि नसीरुद्दीन शाह या अभिनेत्यांना 3 वेळा हा पुरस्कार मिळाला आहे.