बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायक साकारणारे अभिनेते गोविंद नामदेव वयाच्या सत्तराव्या वर्षी एका अभिनेत्रीसोबतच्या फोटोमुळे चर्चेत आले आहेत. गोविंद नामदेव सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. अभिनेत्री शिवांगी वर्मासोबतच्या त्यांच्या एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने फोटोला दिलेलं कॅप्शन वाचून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. ‘प्रेमाचं कोणतं वय नसतं, कोणतीच मर्यादा नसते’, असं कॅप्शन शिवांगीने या फोटोला दिलं होतं. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. 70 वर्षीय गोविंद नामदेव हे त्यांच्यापेक्षा 40 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट करतायत की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. अनेकांनी त्यावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली. या चर्चांवर अखेर गोविंद नामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवांगीसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं, ‘हे रियल लाइफ नाही तर रील लाइफ आहे जनाब! गौरीशंकर गौहरगंजवाले नावाचा एक चित्रपट आहे. या चित्रपटासाठी आम्ही इंदौरमध्ये शूटिंग करत आहोत. ही त्याच चित्रपटाची कथा आहे. ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीला तरुण मुलीवर प्रेम जडतं. माझ्या खऱ्या आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, कोणत्याही तरुण किंवा वृद्धाशी प्रेम होणं हे मला या जन्मात तरी शक्य नाही. माझी सुधा.. माझा श्वास आहे. या आयुष्यातील सर्व लोभ-मोह, अदा, स्वर्गासारखं का असेना.. ते सर्व माझ्या सुधासमोर फिकं आहे. जराही इकडे-तिकडे काही झालं तर मी देवाशीही भांडायला कमी करणार नाही. मग मला शिक्षा झाली तरी पर्वा नाही.’ सुधा या गोविंद नामदेव यांच्या पत्नी आहेत. या पोस्टद्वारे त्यांनी पत्नीविषयीही प्रेम व्यक्त केलंय.
शिवांगी आणि गोविंद नामदेव हे आगामी चित्रपटात एकत्र काम करत आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. या भूमिकेसाठी शिवांगीने ऑडिशन आणि लूक टेस्ट दिले. त्यानंतर तिची निवड करण्यात आली. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच तिने गोविंद नामदेव यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत पेचात पडणारं कॅप्शन दिलं आहे.
गोविंद नामदेव यांनी बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘ओह माय गॉड’, ‘बँडिट क्वीन’, ‘सत्या’, ‘सिंघम’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.