अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे. हरपाल सिंह याच्यावर आरोपींनी रेकी करण्यास मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी हरपाल सिंह याला आज दुपारी 1 वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर भाईजानचे चाहते देखील चिंता व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीचं नाव मोहम्मद चौधरी असं आहे. आता सहाव्या आरोपीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांचं एक पथक गेल्या चार दिवसांपासून भिरडाना याठिकाणी होतं.
पोलिसांच्या पथकाने मोबाईलच्या दुकानांममध्ये देखील चौकशी केली आणि हरपाल सिंह याबद्दल मोहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची मुंबई क्राइम ब्रँच चौकशी करत होती, त्यात हॅरी उर्फ हरपालचं नाव पुढे आलं होतं.
रिपोर्टनुसार, हॅरी उर्फ हरपाल मोबाईल फोनद्वारे अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींच्या संपर्कात होता. याशिवाय आरोपींसोबत त्याचे व्यवहारही होते. मुंबई क्राइम ब्रँचच्या टीमने आतापर्यंत अटक केलेल्या सहा आरोपींमध्ये दोन शार्प शूटरचाही समावेश आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे सहा आरोपींमधील एका अरोपीने तुरुंगातच स्वतःला संपवलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने सागर पाल, विक्की गुप्ता, अनुज थापन आणि सोनू बिश्नोई यांच्यावर मकोका लावला. या गोळीबार प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल हे देखील आरोपी आहेत. या दोघांच्या सांगण्यावरून सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार करण्यात आला आणि त्यापूर्वी रेकीही करण्यात आली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी येत आहे. अनेकदा अभिनेत्याला ईमेलवरून धमकी देण्यात आली. ज्यामुळे अभिनेत्याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. शिवाय भाईजान देखील घराबाहेर पडल्यानंतर बुलेट प्रूफ गाडीतून प्रवास करतो. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर चाहते देखील चिंता व्यक्त करताना दिसतात.