मुंबई- नेहा कक्करच्या (Neha Kakkar) ‘ओ सजना’ या गाण्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. फाल्गुनी पाठकच्या (Falguni Pathak) ‘मैने पायल है छनकाई’ या लोकप्रिय गाण्याचा हा रिमेक आहे. फाल्गुनी पाठकच्या गाण्याचा एक वेगळाच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे नेहा कक्करने चांगल्या गाण्याचा रिमेक बनवून त्याची वाट लावली, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. फक्त नेटकरीच नाही तर खुद्द फाल्गुनीनेही या रिमेकवर नाराजी व्यक्त केली. युट्यूबवर नेहाच्या या गाण्याला लाइक्सपेक्षा डिस्लाइक्सच जास्त असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता संगीत विश्वातील दिग्गज ए. आर. रेहमान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत रेहमान रिमिक्स कल्चरवर व्यक्त झाले. त्यांनी यावेळी नाव न घेता नेहावर निशाणा साधला. “मी जितक्या रिमिक्स गाण्यांना पाहतो, ते मला तितकेच विकृत वाटतात. लोक म्हणतात की जुन्या गाण्यांना आम्ही नवा टच दिला आहे. पण हा नवा टच देणारे तुम्ही कोण आहात? मी नेहमीच दुसऱ्या व्यक्तीच्या कामाबाबत जागरूक असतो. दुसऱ्यांच्या कामाचा मान तुम्ही राखला पाहिजे”, असं ते म्हणाले.
ए. आर. रेहमान यांनी त्यांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट केलं की ते रिमिक्स कल्चरला पाठिंबा देत नाहीत. मूळ कामावर ते अधिक लक्ष केंद्रीत करतात. 90 च्या दशकात फाल्गुनी पाठकची गाणी तुफान हिट ठरली होती. ती गाणी आजही अनेकांच्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत समाविष्ट आहेत.
मूळ गाण्याचे हक्क माझ्याकडे नाहीत, नाहीतर मी कायदेशीर कारवाई नक्कीच केली असती, अशी प्रतिक्रिया फाल्गुनीने दिली. हे नवीन व्हर्जन आवडलं नसल्याचं अनेकांनी मला सांगितलं. कदाचित मला गाण्याच्या हक्काविषयी त्यावेळी समजलं असतं बरं झालं असतं. स्वत:वर जेव्हा एखादी परिस्थिती ओढवते, तेव्हाच कळतं. गाण्याच्या हक्काबद्दल मला त्यावेळी काहीच माहीत नव्हतं, याचा मला पश्चात्ताप होतो. अन्यथा, मी नक्कीच काहीतरी केलं असतं,” असं ती म्हणाली होती.