सुनील जाधव, कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरात ‘द केरळ स्टोरी‘ चित्रपटासाठी रिक्षा चालकांने महिलांसाठी खास ऑफर ठेवली आहे. जोपर्यंत चित्रपटगृहात चित्रपट सुरू आहे तोपर्यंत कल्याण-डोंबिवली परिसरात महिलांना मोफत रिक्षासेवा देणार असल्याचे डोंबिवली मधील रिक्षा चालकाने म्हटले आहे. गणेश मात्रे असे या रिक्षा चालकाचे नाव असून हा रिक्षा चालक कल्याणच्या खोणी परिसरात राहतो. या रिक्षाचालकाने The Kerala Story हा चित्रपटा पाहायला जाणाऱ्या लोकांना आपण मोफत सेवा पुरवणार असल्याचं सांगत आपला मोबाईल नंबर ही त्यांच्या रिक्षावर छापला आहे. या रिक्षाचालकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या बराच वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. केरळमधल्या मुलींचे बळजबरीने धर्मांतर करून नंतर त्यांना दहशतवादी बनवल्याचा दावा या चित्रपटातून करण्यात आला आहे. अभिनेत्री अदा शर्मा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. केरळमधील 32,000 महिलांचे धर्मांतर करून सीरिया आणि येमेनमध्ये पाठवण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, नंतर ही ओळ अन् 32 हजार मुलींचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे.
दुसरीकडे या चित्रपटाच्या टीझरचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या समर्थनात भाष्य केले आहे. आज हा चित्रपट रिलीज झाला आहे अशातच डोंबिवलीत एका रिक्षाचालकाने हा चित्रपट पाहायला जाणाऱ्या महिलांसाठी मोफत रिक्षासेवा देणार असल्याचे जाहीर केले आहे. या रिक्षाचालकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे .
गणेश मात्रे म्हणतो की, ‘मी द केरळ स्टोरीचा टीझर पाहिला. मला तो खूप आवडला. मी ही ऑफर सुरू करण्याचा निर्णय घेतला कारण अनेक हिंदू महिला या लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. मला हिंदू स्त्रियांनी या सापळ्याबद्दल सावध करायचे आहे. मला त्यांना या समस्येची जाणीव करून द्यायची होती. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी मला जाहिरात करायची होती आणि म्हणूनच मी ही ऑफर कल्याण डोंबिवली परिसरातील महिलांना दिली आहे.’