मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट हे चांगलीच धमाल करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मराठी चित्रपटांबद्दलची क्रेझ देखील वाढताना दिसतंय. आता तर अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर हे धमालच करणार असल्याचे स्पष्ट दिसतंय. प्रेक्षकांसाठी धमाकेदार चित्रपट घेऊन दिग्दर्शक प्रसाद खांडेकर येण्यास तयार आहेत. प्रसाद खांडेकर यांनी मराठीतील अनेक कलाकारांना एकत्र आणत नव्या वर्षात नव्या चित्रपटाचा भन्नाट संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प एका व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय मजेशीररित्या त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तगडी मराठी कलाकारांची टिम दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये एक मोठा हाॅल दिसत आहे आणि तिथे हिरव्या रंगाचा एक सोपा ठेवण्यात आलाय. सर्वात अगोदर कॅमेऱ्यासमोर प्रसाद खांडेकर हे येतात आणि ते बोलत सोप्यावर बसतात. ते बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रत्येक वेळी वेगवेगळे कलाकार हे कॅमेऱ्यासमोर येत आहेत आणि हाय, हॅलो करत सोप्यावर जाऊन बसत आहेत.
प्रसाद खांडेकर यांना त्यांचे बोलणेच पूर्ण करता येत नाहीये. असे करत करत संपूर्ण सोपा भरतो आणि थेट कलाकारांना बसण्यासाठी जागा देखील उरत नाही आणि काही कलाकार हे जमिनीवर बसताना देखील दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये अनेक मोठे कलाकार दिसत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय.
व्हिडीओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल रत्नपारखी, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे हे कलाकार दिसत आहेत.
या व्हिडीओमधून हे स्पष्ट दिसतंय की, एकंदरीतच नव्या वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी या चित्रपटामुळे मिळणार आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या जोरदार यशानंतर दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांच्या या नव्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली नसली तरी लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे.