गेल्या आठवड्याभरापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार संकटात आलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालं असताना त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या सत्तानाट्यात आता अभिनेते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी अभिनेते शरद पोंक्षेंवर (Sharad Ponkshe) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘हा शरद पोंक्षे तूच ना?’, असं म्हणत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कॅन्सरवर मात केल्यानंतर पोंक्षेंनी दिलेली ही पहिली मुलाखत होती. यात ते शिवसेना आणि आदेश बांदेकर यांचे आभार मानत आहेत. मात्र तरीही बांदेकरांनी नाराजी का व्यक्त केली? तर पोंक्षेंनी नुकत्याच केलेल्या फेसबुकवरील एका पोस्टनंतर बांदेकरांनी हा मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
शरद पोंक्षेंनी त्यांच्या कॅन्सरवर मात करण्याच्या प्रवासावर नुकतंच एक पुस्तक प्रकाशित केलंय. दुसरं वादळ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात शरद पोंक्षेंसोबत एकनाथ शिंदेंचा एक फोटोही छापला आहे. ‘कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात. त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय,’ अशी पोस्ट पोंक्षेनी लिहिली आहे. तर दुसरीकडे कॅन्सरवर मात केल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत पोंक्षे आदेश बांदेकर आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना दिसत आहेत.
“सगळ्यात पहिला धावून आला तो आदेश बांदेकर. आदेश म्हणाला काळजी करू नकोस तू. डॉक्टर नांदेकडे त्याने मला पाठवलं. मी आदेशला फोन केला, की असं असं सांगतायत रे, अशी शक्यता आहे, तर काय करू, मला खूप टेन्शन आलंय. तो म्हणाला, काळजी करू नको, उद्याच्या उद्या मी तुला नांदेकडे पाठवतो. हिंदू कॉलनीमधले ते खूप मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे पाठवल्यानंतर सगळ्या प्रोसेरला सुरुवात झाली. पहिला आदेश उभा राहिला. आदेशमुळे उद्धव ठाकरेंना कळलं. उद्धव ठाकरेंचा लगेच फोन आला, की शरद काळजी करू नकोस. शिवसेना आणि मी, अख्खी शिवसेना तुझ्या पाठिशी उभी आहे. पैशापासून कसलीही काळजी करायची नाही,” असं ते म्हणतायत. यावरूनच बांदेकरांनी नाराजी व्यक्त करत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली असून महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबतचा तिढा अद्याप कायम आहे. 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयाकडून बंडखोर आमदारांना कारवाईपासून 11 जुलैपर्यंत दिलासा दिला आहे. त्यामुळे तुर्तास तरी शिंदे गटातील आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार नाही.