स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. टीआरपीच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मालिकेने नुकतेच 600 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. या निमित्ताने अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली आहे. मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारताना त्यांच्या मनातील भावना, त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पोस्टद्वारे सांगितले आहेत. या मालिकेच्या पटकथा लेखिका नमिता वर्तक यांनी सर्वप्रथम मिलिंद गवळी यांच्यामध्ये अनिरुद्ध पाहिला. नकारात्मक अनिरुद्ध साकारताना स्वत:मधील सकारात्मकता जराही कमी होऊ देणार नाही, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मिलिंद गवळी यांची पोस्ट-
‘600 भाग पूर्ण झाले.. आई कुठे काय करते या मालिकेतल्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हा मायबाप प्रेक्षकांचे अगदी मनापासून खूप खूप आभार. प्रेक्षकांनी ही मालिका अगदी सुरुवातीपासूनच डोक्यावर घेतली, पहिल्या एपिसोडपासूनच अरुंधती देशमुख ही मनाला भावली, प्रेक्षकांच्या मनात तिने घर केलं, आणि अगदी 600 एपिसोडनंतरसुद्धा मनात रुजली, बहरली, फुलली. पहिल्याच एपिसोडमध्ये अनिरुद्ध देशमुख ती उशिरा घरी येते म्हणून तिला घराच्या बाहेर काढतो, तो प्रसंग पाहून प्रेक्षकांबरोबर माझं स्वतःचंही मन हळहळलं. मला स्वतःला अनिरुद्ध देशमुख कसा आहे तो तेव्हाच कळला. पहिल्या एपिसोडपासून ते आता 600 एपिसोडपर्यंत या अनिरुद्ध देशमुखवर अक्षरश: शिव्यांचा वर्षाव झाला, झाला काय होतोच आहे. जितके लोक अरुंधतीवर प्रेम करतात तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त अनिरुद्ध देशमुखचा तिरस्कार करतात. मला काय त्याचा फार आनंद होतो अशातला भाग नाहीये, वाईट वाटतं. कोणाला शिव्या खाणं आवडतं? अरुंधतीबरोबर वादावादीचे भांडणाचे सीन झाल्यावर खरंच मनाला दुःख होतं, पण कोणाला तरी अनिरुद्ध देशमुखसारखी वाईट भूमिका साकारावी लागेलच. पण या 600 एपिसोड्समध्ये अनिरुद्ध देशमुखची खूप चांगली बाजूसुद्धा प्रेक्षकांच्या समोर आली. मुलांवरचं प्रेम, त्यांच्या भविष्याची काळजी, घर चालवण्यासाठी कष्ट करणे, आई-वडिलांवरचं प्रेम, चूक कबूल करणं, कुटुंबाला महत्व देणं.. खूप अशा त्याच्या चांगल्या गोष्टीसुद्धा समोर आल्या.’
‘आई कुठे काय करतेची पटकथा नमिता वर्तक लिहिते. ती जेव्हा मला म्हणाली की मला तुझ्यामध्ये अनिरुद्ध दिसतो, नंतर मी आत्मपरिक्षण करायला सुरुवात केली आणि खरंच आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माझ्यात अनिरुद्ध देशमुख कुठून कुठून भरलाय तो मलाच कधी दिसला नव्हता. आत कुठेतरी दडून बसला होता, हळूहळू डोकं बाहेर काढायला लागला. नमिताचा खूप आभारी आहे, मला अनिरुद्ध दिल्याबद्दल आणि माझ्यातला अनिरुद्ध दाखवल्याबद्दल. कारण मला माहिती आहे जितका माझ्यातला अनिरुद्ध राक्षस आतून बाहेर येईल तितकाच तो मला एक चांगला माणूस बनवत जाईल. कदाचित म्हणून प्राणसाहेब, अमरीशपुरी, अमजद खान, राजशेखर , निळूभाऊ फुले ही माणसं अतिशय चांगली होती, प्रेमळ होती, सज्जन होती. त्यांच्या आतला राक्षस पडद्यावर बाहेर आला आणि मनाने ते निर्मळ आणि स्वच्छ झाले. अनिरुद्ध देशमुख हा निगेटिव्ह रोल जरी मी करत असलो, तरी सुद्धा माझ्यातली पॉझिटिव्हिटी कधी ही कमी होणार नाही… 600 च्या पुढे,’ असं त्यांनी लिहिलं.
या मालिकेत मधुराणी प्रभुलकर, मिलिंद गवळी, रुपाली भोसले, ओमकार गोवर्धन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. छोट्या पडद्यावरील इतर मालिकांना मागे टाकत या मालिकेने अनेकदा टीआरपीच्या शर्यतीत अग्रस्थान मिळवलं आहे.
संबंधित बातम्या: एकटी बाई म्हणजे जोखिम; बुरसटलेल्या विचारांचा सामना ‘अरुंधती’ कसा करणार?
संबंधित बातम्या: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?