‘दीड वर्षानंतर आईने टिकली लावली’; ‘आई कुठे काय करते’मधील अनघाची भावूक पोस्ट

| Updated on: Nov 09, 2022 | 7:28 PM

टिकलीबद्दल 'आई कुठे काय करते'मधल्या अनघाची विचार करायला लावणारी पोस्ट

दीड वर्षानंतर आईने टिकली लावली; आई कुठे काय करतेमधील अनघाची भावूक पोस्ट
आईसोबत अश्विनीने पोस्ट केला खास फोटो
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून टिकलीवरून मोठा वाद सुरू आहे. या टिकलीवरून अनेकांनी आपापली मतं मांडली. मात्र ‘आई कुठे काय करते’मध्ये अनघाची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी महांगडेच्या पोस्टने नेटकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणलं. दीड वर्षानंतर आईने टिकली लावली आणि हे लावण्याआधी जे काय घडलं, ते तिने या पोस्टमध्ये लिहिलं. दीड वर्षापूर्वी अश्विनीच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर तिच्या आईने टिकली लावली नव्हती.

अश्विनीची पोस्ट-

‘ठसठशीत टिकली लावणारी माझी मम्मी… काल साधारण नाना गेल्यानंतर दीड वर्षांनी ती घराबाहेर पडली. तिला कायम छान असे तयार व्हायला आवडायचे आणि काल मलासुद्धा वाटले की तिने आधीसारखे तयार व्हावे. कदाचित #लोक_काय_बोलतील हा विचार जसा सगळ्यांच्याच मनात येतो तसा तिच्या सुद्धा मनात आला. पण माझ्याकडे पाहून तिने तो विचार #पुरला. ती आधीसारखीच गोड दिसत होती.. पण काहीतरी कमी होते. काय? तिचे कपाळ. या आधी मी खूप वेळा तिला म्हणाले की तू लाव #टिकली. तुला आवडते नं.. मग. पण ती ऐकायची फक्त.

हे सुद्धा वाचा

आई कुठे काय करतेमध्ये अनघा एकदा म्हणाली होती की लग्नाच्या आधी सुद्धा टिकली लावतोच की मग पती गेल्यानंतर ते बंद का करायचे? मी हा विचार सहज बोलले पण परत विचार केला की तिला असे सारखे टिकली लाव बोलणे योग्य नाही. तिला वाटले तर लावेल ती आणि काल ती स्वतः म्हणाली, ताई.. टिकली लावू का गं?

आधी आणि आता सुद्धा आम्ही तिच्याकडून परवानगी घेतो आणि आज #लोक_काय_बोलतील या विचारात तिने मला विचारावे? मी क्षणात म्हणाले लाव की. त्यावर सज्जूने टिकली आणून दिली आणि माझी मम्मी पुन्हा एकदा देखणी, रुबाबदार आणि अगदी नानांना जशी आवडायची तशी दिसली. रुचिका (भावा) ने तिचे, आमचे मनसोक्त फोटो काढले आणि दीड वर्षानंतर आम्ही देवदर्शनासाठी बाहेर पडलो.

काल आणखी एक अप्रतिम गोष्ट घडली. आम्ही आमच्या छकुलीचा वाढदिवस साजरा केला. काल दीड वर्षानंतर पहिल्यांदा मम्मीने कुंकू हातात घेतले, छकुलीला ओवाळले. ही आमची सगळ्यात मोठी जीत आहे असे मी मानते.

#लोक_काय_बोलतील यापेक्षा आता तिने तिला सांभाळावे, ज्यात खंड पडला त्या गोष्टी अनाहूतपणे होत असतील तर कराव्या. तिने आनंदी राहावे. #नाना देव होते आमच्या घराचे. ते कधी, कसे विसरता येईल. तुमच्या आईला थोडा विश्वास देण्याची गरज आहे, एकदा मिठी मारण्याची गरज आहे आणि मुख्य म्हणजे आता आपण मोठे झालो आहोत तर कधीतरी त्यांचे लाड देखील करण्याची गरज आहे. फक्त प्रेम आणि आदर,’ अशी पोस्ट तिने लिहिली.

अश्विनीच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तुझे खूप सुंदर विचार आहेत. खरंच आता लोकांचे विचार बदलण्याची गरज आहे’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘मुलगी आईची आणि आई मुलीची सर्वांत जवळची मैत्रीण असते. मैत्रिणीनं मैत्रिणीचं मन जाणून घ्यायचं, सांभाळायचं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी त्यांचेही अनुभव कमेंट बॉक्समध्ये सांगितले.