कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेतला अत्यंत महत्वाचा टप्पा या आठवड्यात उलगडणार असून महिषासुराचे तप पूर्णत्वाला गेले आहे. ब्रम्हदेवाकडून मिळालेल्या वरदानाने बलशाली झालेल्या महिषासुराच्या नव्या रुपाचा, त्याच्या त्रैलोक्याच्या सम्राट होण्याच्या प्रवासाचा अत्यंत नाट्यमय टप्पा मालिकेत उलगडणार आहे. ‘आई तुळजाभवानी’च्या अवतार कार्याच्या प्रयोजनाचे महत्वाचे कारण ठरलेला महिषासुराचा उन्माद आणि देवीसमोर उभे राहिलेले आव्हान हा प्रत्येक देवी भक्तांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. हा कथाभाग आता मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार असून तो अत्यंत रंजक प्रकारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. महिषासूर त्याला मिळालेल्या वरदानाचा कसा दुरुपयोग करतो, तो कसे देवांना नामोहरण करणार, त्याची स्वर्गावर आधिपत्य गाजविण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी महिषासुर कसा उच्छाद मांडणार, या सगळ्यात सगळे देव एकत्रित येऊन कसे शिवशक्तीला शरण जाणार, आई तुळजाभवानी आता महिषासुराचा वध कसा करणार.. ही गाथा मालिकेत उलगडणार आहे.
कुमार हेगडे हे लोकप्रिय अभिनेते महिषासुराची भूमिका साकारत असून त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले की, “महिषासुर साकारणे अत्यंत आव्हानात्मक असून या भूमिकेला असलेले वेगवेगळे पदर ही भूमिका इतर असुर भूमिकांपेक्षा वेगळी ठरते. याआधी मी हिंदीयामध्ये अनेक पौराणिक शो केले आहेत, पण मराठीतील ही माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अर्थातच दडपण आले होते. महिषासुर साकारताना खूप गोष्टींची दखल घेण्यात आली. अगदी त्याच्या वेषभूषेपासून, त्याच्या देहबोलीवर. मी स्वतः अनेकी गोष्टी वाचल्या अजूनही अभ्यास सुरूच आहे. लढाईचे दृश्य जेव्हा मालिकेत दाखवण्यात येतात त्यासाठी देखील विशेष तयारी करण्यात आली आहे.”
“महिषासुराची आभूषणं, त्याचा पेहराव हे सगळं धरून जवळपास तयार होण्यासाठीच एक ते दोन तास लागतात आणि जर लढाईचे प्रसंग असतील तर त्याचा सराव, आणि पूर्वतयारी, शूट हे धरून चार ते साडेचार तास लागतात. ही मालिका माझ्यासाठी खूप जवळची मालिका आहे आणि हे पात्रदेखील. मालिकेबद्दल आणि भूमिकेच्या आलेखाबद्दल सांगायचे झाले तर, असुरांसोबत अन्याय झाल्याची असुर महामाता दीतीने कायम ठसठसत ठेवलेली जखम आणि फुलवलेला अंगार, असुरांच्या अंतर्गत संघर्षातून राजा होण्याची महत्वाकांक्षा, पृथ्वीवर कर्दम ऋषिच्या आश्रमात ज्या गावकरी स्त्रीच्या प्रेमात पडलो तिचा ध्यास अश्या अनेक पातळ्यांवर या भूमिकेचा आलेख फिरतो. म्हणूनच ही भूमिका वेगळी ठरते,” असं ते पुढे म्हणाले.