आमिर खानच्या ‘दंगल’ हा चित्रपट 2016 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कुस्तीमध्ये प्रसिद्ध असलेल्या फोगट कुटुंबावर या चित्रपटाची कथा आधारित होती. ‘दंगल’ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. केवळ भारतातच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही या चित्रपटाने भुरळ घातली होती. आमिर खानच्या ‘दंगल’ने रेकॉर्ड ब्रेक 2000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. चित्रपटाने जरी रग्गड कमाई केली असली तरी त्यापैकी फोगट कुटुंबीयांना किती पैसे मिळाले, याविषयीचा खुलासा कुस्तीपटू बबिता फोगट यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. बबिता यांनी सांगितलेला आकडा ऐकून मुलाखत घेणाराही चकीत झाला.
‘न्यूज 24’ला दिलेल्या मुलाखतीत बबिता यांनी सांगितलं की त्यांना फक्त एक कोटी रुपये मिळाले. यावर विश्वास न बसल्याने मुलाखतकर्त्याने पुन्हा एकदा बबिता यांना विचारलं, “दोन हजार कोटी रुपयांपैकी तुम्हाला फक्त एक कोटी रुपयेच मिळाले का?” तेव्हा बबिता यांनी होकारार्थी मान हलवत ‘होय’ असं म्हटलं. चित्रपटाने इतकी तगडी कमाई करूनही त्यातून फक्त एक कोटी रुपये मिळाल्याने निराशा झाली का, असा प्रश्न पुढे बबिता यांना विचारला असता त्यावर त्यांनी अत्यंत विचारपूर्वक उत्तर दिलं. “नाही, बाबांनी एक गोष्ट सांगितली होती की लोकांचं प्रेम आणि आदर पाहिजे”, असं बबिता यांनी सांगितलं.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ हा चित्रपट 23 डिसेंबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये आमिर खानने बबिता यांचे वडील महावीर फोगट यांची भूमिका साकारली होती. आमिर या चित्रपटाचा सहनिर्मितासुद्धा होता. महावीर फोगट यांनी त्यांच्या मुलींना कशाप्रकारे कुस्तीचं प्रशिक्षण दिलं आणि कुस्तीच्या विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली, याविषयीची कथा या चित्रपटात पहायला मिळते.
बबिता फोगट यांनी 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक पटकावलं होतं, तर त्यानंतर 2014 मध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. 2012 मध्ये त्यांनी वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप्समध्ये कांस्यपदक पटकावलं होतं. बबिता यांनी 2016 मध्ये रियो ऑलिम्पिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2019 मध्ये बबिता यांनी प्रोफेशनल रेसलिंगमधून निवृत्ती घेत राजकारणात पाऊल ठेवलं.