‘सगळं केलं, पण श्रीदेवीसोबत ‘ही’ इच्छा राहिलीच’ आमिर खानने सांगितली मनातील खंत

| Updated on: Jan 11, 2025 | 9:56 AM

नुकताच आमिर खानने त्याचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवीची कन्या खुशी कपूर यांच्या 'लवयापा' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटला हजेरी लावली. यावेळी आमिर म्हणाला की, ‘तो श्रीदेवीचा मोठा फॅन आहे. यावेळी आमिरने श्रीदेवीसोबत राहिलेली एक अपूर्ण इच्छा देखील बोलून दाखवली. आता ती इच्छा नेमकी काय होती, जाणून घेऊया.

सगळं केलं, पण श्रीदेवीसोबत ‘ही’ इच्छा राहिलीच आमिर खानने सांगितली मनातील खंत
Follow us on

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने कुणासोबत काम नाही केलं? त्याने बॉलिवूडमधील बहुतेक सर्वच दिग्गज अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. मग जुही चावला, काजोल, करिना कपूर, करिश्मा कपूरसह बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींसोबत तुम्ही आमिरला पाहिलं आहे. मात्र, त्याने एका अभिनेत्रीचे नाव घेतले आणि तिच्यासोबत काम करण्याची इच्छा अपूरी राहिल्याची खंत व्यक्त केली. हे सगळं आमिर त्याच्या मुलाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटमध्ये बोलत होता.

आमिर खानने मुलगा जुनैद खान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या खुशी कपूर यांच्या ‘लवयापा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटला हजेरी लावली. या चित्रपटासाठी आमिरने दोघांचेही अभिनंदन केले. या कार्यक्रमात आमिर भावूक झाला. त्याने बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा देखील यावेळी उल्लेख केला. तो नेहमीच त्यांचा मोठा चाहता असल्याचं यावेळी आमिर म्हणाला. पुढे त्याने एक अपूर्ण राहिलेली इच्छा देखील बोलून दाखवली.

मुंबईत झालेल्या ‘लवयापा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंट आमिर खानने श्रीदेवी यांची आठवण काढली. 10 जानेवारीला आमिरचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांच्या ‘लवयापा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटला आमिरने हजेरी लावली होती. त्याने ट्रेलर लाँच केला. त्यावेळी श्रीदेवीची आठवण काढत तो खूप भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

श्रीदेवीबद्दल काय म्हणाला आमीर खान?

आमिर खान म्हणाला की, ‘माझे स्वप्न होते की, एक दिवस मला श्री यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी. हा एक आनंदाचा चित्रपट आहे आणि हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे.’ तो म्हणाला की, मी नेहमीच श्रीदेवीचा चाहता आहे. खुशीचा चित्रपट पाहिल्यानंतर श्रीदेवीला पुन्हा पाहिल्यासारखं वाटलं, असंही तो यावेळी म्हणाला.

‘श्रीदेवीसोबत काम करण्याची संधी मिळाली नसली तरी मुलगा जुनैद खुशी कपूरसोबत काम करत आहे याचा आनंद आहे,’ असेही आमिरने सांगितले. जुनैद आणि खुशी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. दोघांचा हा रुपेरी पडद्यावरील डेब्यू चित्रपट आहे. नेटफ्लिक्सवर खुशीचा पहिला चित्रपट ‘द आर्चीज’ आणि जुनैदचा ‘महाराज’ आला होता.

‘लवयापा’ कधी प्रदर्शित होणार?

अद्वेत चंदन यांनी ‘लवयापा’चे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. आशुतोष राणा देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात जेन-झेड जोडप्याची लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. मात्र, आता हे दोघं या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्सवर कसं दाखवतात हे पाहावं लागेल.