लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रिटी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना दिसत आहेत. अभिनेता आमिर खानचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र हा व्हिडीओ ‘डीपफेक’ असल्याचं निष्पन्न झालं आहे. आमिरच्याच ‘सत्यमेव जयते’ या शोमधल्या एका क्लिपला एडिट करून हा डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आला आहे. आमिरने संबंधित व्हिडीओवर प्रतिक्रिया देत राजकारण किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याविरोधात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आमिरने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
“गेल्या 35 वर्षांच्या करिअरमध्ये माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध आला नाही. निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात माझा सहभाग होता. पण मी कोणासाठी कधीच प्रचार केला नाही”, असं स्पष्टीकरण आमिरने दिलं आहे. संबंधित डीपफेक व्हिडीओमध्ये आमिर हा भारतीय जनता पार्टीवर टीका करताना आणि काँग्रेस पक्षाचं समर्थन करताना दिसत आहे.
भारत का हर नागरिक लखपति है
क्योंकि सबके पास काम से कम 15 लाख तो होने ही चाहिए ..
क्या कहा
आपके अकाउंट में 15 लाख नहीं है..
तो आपके 15 लाख गए कहां ???
तो ऐसे जुमलेबाजों से रहे सावधान
नहीं तो होगा तुम्हारा नुकसान
🇮🇳🇮🇳🇮🇳देशहित में जारी🇮🇳🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/jDQUjypQhf— Rani Sharma (@dobwal6212) April 15, 2024
31 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये आमिर म्हणतोय, “मित्रांनो, भारत हा गरीब देश आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. या देशातील प्रत्येक नागरिक लखपती आहे. प्रत्येकाकडे किमान 15 लाख रुपये असतील. काय? तुमच्याकडे हे पैसे नाहीत? मग 15 लाख रुपये कुठे गेले? अशा खोट्या आश्वासनांपासून स्वत:ला वाचवा.” या व्हिडीओच्या अखेरीस काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन आमिर करताना दिसतोय. भाजपने प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. आमिरने त्याचीच खिल्ली उडवल्याचं म्हटलं गेलंय.
आमिरचा हा व्हिडीओ नीट लक्ष देऊन पाहिल्यास काही भागात त्याचा आवाज आणि ओठांची हालचाल वेगळं असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओच्या अखेरीस ‘सत्यमेव जयते’ असंही मागे ऐकायला मिळतंय. आमिरच्या ‘सत्यमेव जयते’ या शोचा 6 मे 2012 रोजी प्रसारित झालेल्या व्हिडीतून हा डीपफेक बनवण्यात आल्याचं स्पष्ट होतंय.