मुंबई : 6 फेब्रुवारी 2024 | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी 2021 मध्ये विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. घटस्फोटानंतरही अनेक प्रोजेक्ट्सनिमित्त आणि कौटुंबिक कार्यक्रमांनिमित्त या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. आमिर आणि किरण यांच्यात घटस्फोटानंतरही मैत्रीपूर्ण नातं आहे. याबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने मोकळेपणे प्रतिक्रिया दिली आहे. विभक्त झाल्यानंतरही किरणसोबत काम करण्याविषयीचा प्रश्न आमिरला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आमिरनेच प्रतिप्रश्न केला. “हे कोणत्या डॉक्टरने सांगितलंय का की घटस्फोट झाल्यानंतर तुम्ही लगेच एकमेकांचे शत्रू होता”, असा सवाल त्याने केला.
याविषयी तो पुढे म्हणाला, “हे माझं सुदैव आहे की माझ्या आयुष्यात किरण आली आणि आमचा आतापर्यंतचा प्रवास माझ्यासाठी परिपूर्ण आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर आम्ही दोघांनी मिळून बऱ्याच गोष्टी घडवल्या आहेत आणि यापुढेही आम्ही सोबतच असू. आम्ही माणूसकी आणि भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले आहोत आणि यापुढेही राहू. आम्ही एका कुटुंबासारखेच आहोत.” यावेळी किरणनेसुद्धा आमिरसोबत काम करताना मजा येत असल्याचं सांगितलं.
किरणचं कौतुक करताना आमिर पुढे म्हणाला, “माझ्या मते किरणचं मन खूपच सुंदर आहे आणि ती खूप हुशार आहे. कधीकधी कामादरम्यान ती मला ओरडते, तेसुद्धा मी एंजॉय करतो. आम्ही सोबत मिळून जे काम करतो, त्यात दोघांनाही खूप मजा येते.” यावेळी आमिर आणि किरणने मिळून ‘धीमे धीमे चले पुर्वैय्या’ हे गाणंसुद्धा गायलं. गेल्या सहा महिन्यांपासून शास्त्रीय संगीत शिकत असल्याचा खुलासाही आमिरने यावेळी केला.
या मुलाखतीत आमिर त्याला मिळणाऱ्या भूमिकांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “जर एखाद्या चित्रपटाची कथा रोमँटिक असेल तर असा चित्रपट करायला मला आवडेल. या वयात रोमान्स थोडं अनकॉमन (असामान्य) असतं. पण कथेनुसार जर ती भूमिका माझ्यासाठी योग्य वाटत असेल तर मी नक्कीच काम करेन. मला विविध विभागातील भूमिका साकारायला आवडतील. पण वयानुसार त्या भूमिका मला साजेशा असल्या पाहिजेत. अचानक जर मला 18 वर्षांच्या मुलाची भूमिका दिली, तर ते मी करू शकणार नाही”, असं त्याने सांगितलं.