‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. या सिझनच्या पहिल्या एपिसोडपासूनच घरात दोन गट पडले. या दोन्ही गटांमध्ये बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस सुरू आहे. अशातच टास्कदरम्यान जेव्हा भांडणं होतात, तेव्हा काही स्पर्धकांच्या संयमाचा बांध सुटतो. असंच काहीसं ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाणसोबत झालं होतं. योगिताने थेट रितेश देशमुखकडे शो सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यावरून आता ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची स्पर्धक आरती सोळंकीने टोमणा मारला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आरतीने योगितावर निशाणा साधला आहे.
‘अल्ट्रा मराठी बझ’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आरती सोळंकीने ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांविषयी आपलं मत मांडलं आहे. यात ती अभिनेत्री योगिता चव्हाणविषयी स्पष्टच बोलली. काही दिवसांपूर्वीच योगिताने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची इच्छा बोलून दाखवला होती. त्यावरून आरतीने निशाणा साधला आहे. “मी स्वत: बिग बॉसच्या घरात राहिले आहे. बिग बॉस कधीच कोणाला घरातून बळजबरीने खेचून आणत नाही. हा शो कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे. तुमची मेडिकल टेस्ट होते, त्यानंतर तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवलं जातं. तरीही तुम्ही घरात आल्यानंतर रडारडी करता”, अशा शब्दांत तिने सुनावलं.
याविषयी ती पुढे म्हणाली, “सातव्या किंवा आठव्या आठवड्यानंतर घरी जावंसं वाटणं स्वाभाविक आहे. आता बिग बॉसच्या घरात भांडणं होतात, हे सर्वांनाच माहित आहे. त्यासाठी आधीच मनाची तयारी करावी लागते. पण शोच्या दुसऱ्या-तिसऱ्याच दिवशी तुम्ही रडत बसता. मग मी तर म्हणेन की तुम्ही बिग बॉसला मूर्ख बनवलंय आणि तुम्ही महाराष्ट्रालाही मूर्ख समजताय. तुम्ही शोमध्ये यायलाच पाहिजे नव्हतं.”
या सिझनचा दुसरा भाऊचा धक्का जेव्हा पार पडला, तेव्हा रितेश देशमुखने काही कलाकारांचं कौतुक केलं होतं, तर काहींची चांगलीच शाळासुद्धा घेतली होती. जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव, निक्की या सदस्यांना रितेशने सुनावलं होतं. तर सूरज चव्हाण आणि योगिताच्या खेळीचं कौतुक केलं होतं. यावेळी योगिताला अश्रू अनावर झाले होते. तिने रितेशसमोर थेट शो सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती. ती रडत रितेशला म्हणाली होती, “मला माहीत नाही की मी कशी खेळतेय? पण मला इथे नाही राहायचंय. माझी चूक झाली, मी इथे आले. मी इथे यायलाच नको होतं. मला हे सहन होत नाही. मी इथे नाही राहू शकत. मला घराबाहेर पडायचंय. मला हा खेळ सोडायचा आहे.”