कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून 25 पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्या वकिलानी न्यायालयात दिली. दोषींवर कठोर कारवाई आणि न्यायालयीन चौकशीची मागणी करत राज्यातील सरकारी रुग्णालयांतील शिकाऊ डॉक्टर, आंतर्वासित डॉक्टर आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर शनिवारपासून निदर्शनं करत आहेत. सोशल मीडियावर विविध सेलिब्रिटी या घटनेबाबत पोस्ट लिहून संताप व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकरने याप्रकरणी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. लोकांमधील भीतीच नष्ट झाल्याचं, तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.
‘खूपच चिंताजनक बातम्या वाचनात येत आहेत. पुण्यातील अपघात, कोलकाता डॉक्टर प्रकरण किंवा एका कुटुंबाचं धरणात वाहून जाणं असो. या घटनांमधील एक सामान्य धागा असा वाटतो की लोकांनी घाबरणंच सोडून दिलंय किंवा लोक भीती व्यक्त करायला संकोच करत आहेत याची चिंता वाटते. आजकाल भीती आणि चिंता, काळजी यांसारख्या मूलभूत मानवी भावनासुद्धा चुकीच्या प्रकारे दाखवल्या जात आहेत. (जीवनात आवश्यक असणाऱ्या प्रमाणातल्या भीती आणि चिंतेविषयी बोलत आहे.) याचा परिणाम म्हणून लोक मोकळेपणे भीती व्यक्त करायलाच तयार नाहीत. कदाचित वाढती अनियंत्रित वर्तनं याचाच परिणाम असेल का? मला असं वाटतंय की शाळांमध्ये एनसीसीसारखे शिस्तीचे आणि मनोविज्ञान शिक्षणाचे, थेरपीचे धडे समाविष्ट करणं आवश्यक झालं आहे. त्याचप्रमाणे या स्वातंत्र्यदिनी आपण असुरक्षित आहोत ही भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य एकमेकांना देऊयात,’ असं तिने म्हटलंय.
आर्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोलकाता प्रकरणाचं लोण मंगळवारी संपूर्ण देशभरात पसरलं. दिल्लीतील ‘एम्स’सह अनेक रुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम झाल्याचं दिसून आलं. याप्रकरणी सुरुवातीलाच खुनाचा गुन्हा दाखल का केला नाही? पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद का केली? डॉक्टरचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला सापडला नव्हता. रुग्णालयाचे अधीक्षक किंवा प्राचार्यांना तक्रार दाखल करता आली असती- असं कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवज्ञानम यांनी म्हटलंय. दरम्यान पीडितेला न्याय देण्याऐवजी रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनाकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला.