नव्वदच्या दशकात ‘आशिकी’ या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री अनु अग्रवाल सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रोल होत आहे. यामागचं कारण म्हणजे तिने थर्टी फर्स्टला पोस्ट केलेला व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये अनु अत्यंत शॉर्ट ड्रेस परिधान करून डान्स करताना दिसत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. अनुचे तोकडे कपडे आणि विचित्र डान्स पाहून नेटकरी म्हणाले, “हा अत्यंत फालतूपणा आहे.” अनुने आपला दर्जा टिकवून ठेवावा, असे सल्ले काही नेटकऱ्यांनी दिले आहेत. अनु अग्रवाल तिच्या लूकमुळे ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही नवरात्रीत बोल्ड फोटोशूट केल्याने नेटकरी तिच्यावर भडकले होते.
अनुने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ती ख्रिसमस ट्रीसमोर अत्यंत शॉर्ट ड्रेसमध्ये नाचताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिलं, ‘आशिकी चित्रपटासाठी आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. कृपया आपला इतिहास खराब करू नकोस. स्वत:चा दर्जा टिकवून ठेव.’ तर दुसऱ्याने म्हटलं, ‘तुला असे व्हिडीओ पोस्ट करण्याची अजिबात गरज नाही. कारण लोक असंही तुझ्यावर प्रेम करतात. कृपया आपला सन्मान आणि दर्जा टिकवून ठेव.’
‘आशिकी’ या चित्रपटानंतर अनु अग्रवाल बॉलिवूडमधील अत्यंत प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री होईल, असं अनेकांना वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने 1999 मध्ये तिचा एक भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यानंतर ती कोमात गेली आणि अनेक महिने तिला काही गोष्टी आठवतही नव्हत्या. या अपघाताच्या अनुच्या करिअरवर मोठा परिणाम झाला आणि ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. त्यानंतर तिने आपलं आयुष्य योग आणि समाजसेवेसाठी समर्पित केलं.
या अपघाताबद्दल अनुने एका मुलाखतीत सांगितलं, “तो काळ फक्त कठीण नव्हता. तर तो माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. मी कोमामध्ये होती. मी जगू शकेन की नाही, असा प्रश्न कुटुंबीयांना होता. जर वाचले तर मी पॅरालाइज्ड होईन की काय, अशीही भीती होती.” अपघातानंतर जवळपास 29 दिवसांनी अनु कोमातून बाहेर आली होती. मात्र त्यानंतर बराच काळ ती बेडवरून उठू शकत नव्हती. कारण तिचं अर्ध शरीर हे पॅरालाइज्ड होतं. त्या घटनेमुळे केवळ तिच्या शरीरावरच नाही तर मानसिक स्वास्थ्यावरही खोलवर परिणाम झाला होता.