मुंबई : 30 जानेवारी 2024 | पॉप कल्चर डिक्शनरीमध्ये ‘नॅशनल क्रश’ हा शब्द अस्तित्वात येण्याआधीपासूनच अभिनेत्री अनु अगरवाल देशभरात ‘नॅशनल क्रश’ ठरली होती. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ या पहिल्यावहिल्या चित्रपटातूनच तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मात्र त्याच्या काही वर्षांनी अनुचा अपघात झाला आणि त्यात तिचा स्मृतिभ्रंश झाला. अनु स्वत:लाही ओळखू शकत नव्हती. महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ या चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अगरवाल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटानंतर दोघांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. पहिल्या चित्रपटाच्या पाच वर्षांनंतर अनु अभिनयापासून दूर गेली. 1999 मध्ये अनुचा जीवघेणा अपघात झाला होता. या अपघातानंतर ती 29 दिवस कोमामध्ये होती. त्यानंतर जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा तिला काहीच आठवत नव्हतं.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुने अपघातानंतरच्या आठवणी सांगितल्या. “अपघातानंतर जेव्हा माझा स्मृतिभ्रंश झाला, तेव्हा मी आशिकी हा चित्रपट पाहिला होता. माझ्या आईने माझ्यासाठी तो चित्रपट लावला होता. पण त्या चित्रपटाच्या कोणत्याच आठवणी मला आठवत नव्हत्या. ऑनस्क्रीन दिसणाऱ्या मुलीला मी ओळखतच नव्हते. माझी आई मला सतत सांगत होती की ती तूच आहेस. पण एखाद्या लहान मुलीप्रमाणे मी तिच्याकडे बघत राहिले होते. मी तिच्याशी कनेक्ट होत नव्हते. त्यावेळी आशिकाचा दुसरा भाग थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. म्हणून आईने माझा चित्रपट लावला होता. पण त्यावेळी मला काहीच आठवत नव्हतं”, असं तिने सांगितलं.
याविषयी अनु पुढे म्हणाली, “आशिकी हा तुझा चित्रपट आहे आणि आता त्यांनी आशिकी 2 प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे, असं आई मला सांगत होती. मी तिला त्यावेळी विचारत होते की हे ‘2’ म्हणजे काय? कारण मत्यावेळी मला एक, दोन, तीन हे क्रमांकसुद्धा माहीत नव्हते. अशी माझी अवस्थी होती. ऑनस्क्रीन दिसणारी मुलगी मीच होती, याचा विचार मी करू शकत नव्हते, पण मला तिच्या भावना जाणवत होत्या. त्या चित्रपटाच्या भावना तितक्या तीव्र होत्या. म्हणूनच लोक आजही त्या चित्रपटाबद्दल बोलतात. अखेर प्रेक्षक अशाच गोष्टींवर प्रतिक्रिया देतात, ज्याला पाहून ते हसतात आणि रडतात.”
जवळपास तीस वर्षांपूर्वी ती स्वत:हून या इंडस्ट्रीपासून लांब गेली होती. अनु अगरवालला पुन्हा एकदा अभिनयात यायचं आहे. यासाठी ती योग्य स्क्रिप्टची प्रतीक्षा करतेय. “सर्वांत आधी मॉडेलिंग, त्यानंतर एंटरटेन्मेंट बिझनेस आणि मग चित्रपटांमधून माझी कमाई झाली होती. मी अभिनेत्री आहे. मी बराच काळ या इंडस्ट्रीपासून दूर होते, पण मला इथे पुन्हा अभिनय करायचंय. मी दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना भेटतेय. मी त्यांच्याकडून स्क्रीप्टसुद्धा ऐकतेय. मला एखादी स्क्रीप्ट आवडल्यास मी नक्की त्यात काम करेन”, असं तिने स्पष्ट केलं.