सलमान खानचा भावोजी आणि अभिनेता आयुष शर्मा सध्या त्याच्या आगामी ‘रुसलान’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतींमध्ये तो त्याच्या पत्नी आणि खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इतकंच नव्हे तर सलमानच्या बहिणीशी स्वार्थामुळे लग्न केल्याच्या ट्रोलिंगवरही त्याने सडेतोड उत्तर दिलं आहे. अर्पिता आणि आयुषच्या जोडीला अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. अर्पिताचा रंग सावळा असून ती दिसायलाही काही खास नाही, तरी आयुषने तिच्याशी स्वार्थासाठी लग्न केलं, अशी टीका आयुषवर सतत होते. “अर्पिताने मला सांगितलं होतं की जी लहान असल्यापासूनच लोक तिला ‘काळी’ म्हणून हिणवायचे. पण अशा टिप्पण्यांकडे ती लक्ष देत नाही. कारण लोक त्यांना वाट्टेल ते बोलतात, त्यांना वाट्टेल ती गोष्ट करू शकतात. मला तिचा हा स्वभाव खूप कौतुकास्पद वाटतो”, असं आयुष म्हणाला.
पत्नीच्या वर्णावरून होणारी चर्चाच हास्यास्पद वाटत असल्याचं आयुषने सांगितलं. यावर बोलताना त्याने देशातील बहुतांश लोकांच्या रंगावरून प्रश्न उपस्थित केला. “या देशात प्रत्येक व्यक्ती गोरी आहे का? मी हिमाचलचा असल्याने माझा रंग असा आहे. मात्र काहींचा रंग सावळा असतो. यात काय वाईट आहे? कोणत्या गोष्टीमुळे हे लोक स्किन कलरच्या मागे इतके हात धुवून लागले आहेत? का? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण अमेरिकेतल्या मुद्द्यावर इथे बोलतो की ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’ आणि इथे स्वत:च्याच लोकांच्या वर्णाची खिल्ली उडवली जातेय”, अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सचं तोंड बंद केलं.
पैसे आणि बॉलिवूडमध्ये सहज एण्ट्री मिळवण्यासाठी त्याने सलमानच्या बहिणीशी लग्न केलं, अशीही टीका अनेकदा झाली. त्यावर तो म्हणाला, “बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याआधी मी 300 ऑडिशन्स दिल्या होत्या. ज्यावेळी माझी अर्पिताशी मैत्री झाली तेव्हासुद्धा मी स्ट्रगलिंग अभिनेताच होतो. लग्नाआधी अर्पिताला माझ्या चरित्राविषयी समजलं नसेल का? ती इतकी भोळी आहे का? संपूर्ण खान कुटुंबाला माझ्याविषयी माहिती नसेल का? त्यामुळे ही सर्व तथ्यहीन चर्चा आहे. एक गोष्ट अनेकांना माहीत नाही की ज्यावेळी माझं अर्पिताशी लग्न ठरलं, तेव्हा मी सलमान सरांना सांगितलं होतं की मला अभिनय करायचा नाही. कारण मी आतापर्यंत 300 ऑडिशन्स दिले आहेत आणि तरी काहीच झालं नाही. त्यामुळे मी अजून प्रयत्न करू शकत नाही. तेव्हा सलमान सरांनी मला प्रशिक्षण देण्याचं ठरवलं होतं.”