बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानने इंडस्ट्रीत अनेकांना लाँच केलं. बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्मालाही सलमाननेच बॉलिवूडमध्ये संधी दिली. सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत त्याने आतापर्यंत चित्रपट केले. मात्र आता त्याने सलमानच्या बॅनरबाहेर जाऊन दुसऱ्या निर्मात्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सलमानचं त्याच्या भावोजीसोबत काही बिनसलं का, अशा चर्चांना उधाण आलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुषने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत सलमान खान फिल्म्स सोडण्यामागचं कारणसुद्धा त्याने सांगितलं आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आयुष म्हणाला, “आमच्यात काहीच बिनसलं नाही. हे माझं घर आहे. कोणताच अभिनेता फक्त एकाच प्रॉडक्शन हाऊससोबत काम करत नाही. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, हे खूपच हास्यास्पद आहे, पण माझी निवड हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी फक्त त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये काम केलंय. ज्यांना फक्त ठराविक प्रॉडक्शन हाऊससोबत काम करायला आवडतं. हेच कलाकार कधीकधी त्यातून बाहेर पडून काम करतात आणि पुन्हा त्याच प्रॉडक्शनकडे परत जातात. मलासुद्धा माझ्या चौकटीबाहेर पडून काम करायचं होतं. मी फक्त माझ्या कुटुंबात किंवा एकाच चौकटीत काम करत राहू शकत नाही. यामुळे माझ्या प्रगतीवरही परिणाम होतो. म्हणून कुटुंबाबाहेर जाऊन काम करण्याचा निर्णय मी अत्यंत विचारपूर्वक केला आहे. मला अजून बरंच काही शिकायची, स्वत:बद्दल अधिक जाणून घेण्याची गरज आहे.”
आयुष शर्माने ‘लव्हयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याने वरिना हुसैनसोबत स्क्रीन शेअर केला होता. सलमान खान फिल्म्सनेच या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर तो सलमानच्याच ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात झलकला. आयुष हा सलमानची बहीण अर्पिता खानचा पती आणि भाजप नेते अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. आयुषचे आजोबा दिग्गज काँग्रेस नेते पंडित सुखराम आहेत.