अभिनेता सलमान खानचा भावोजी म्हणजेच त्याची बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्मा याने ‘लव्हयात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. आता आयुष पहिल्यांदाच दुसऱ्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत बनलेल्या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत आयुष विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाला. पैशांसाठी आणि बॉलिवूडमध्ये सहज एण्ट्री मिळवण्यासाठी अर्पिताशी लग्न केलं, या ट्रोलिंगवरही त्याने प्रतिक्रिया दिली. त्याचसोबत जेव्हा ‘लव्हयात्री’ फ्लॉप झाला तेव्हा सलमान आणि त्याच्यामध्ये फोनवरून काय बोलणं झालं, याविषयीही त्याने सांगितलं.
तो म्हणाला, “आता मी माझ्या इनकम टॅक्सची माहितीसुद्धा इन्स्टाग्रामवर शेअर करू का? माझ्याकडे किती पैसा आहे आणि त्याचं मी काय करतो, हेसुद्धा आता लोकांना दाखवू का? 2018 मध्ये जेव्हा जेव्हा लव्हयात्री बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला जेव्हा सलमान भाईने मला त्या रात्री फोन केला होता. मला काय वाटतंय हे त्याला जाणून घ्यायचं होतं. त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याला मी म्हणालो, मला माफ कर. मी तुझे पैसे बुडवले. तेव्हा सलमान भाई मला म्हणाला की तू वेडा झाला आहेस का? असं का बोलतोय? माझ्या डोक्यात काय विचार होते, मला काय वाटत होतं हे त्याला जाणून घ्यायचं होतं.”
आयुषचे वडील आणि आजोबा राजकारणी आहेत. कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असताना आयुषला अभिनयात करिअर करायचं होतं. मात्र त्याच्या वडिलांचा या निर्णयाला विरोध होता. याविषयी त्याने सांगितलं, “माझे वडील मी अभिनेता होण्याच्या निर्णयाविरोधात होते. त्यांच्या विरोधात जाऊन मी तब्बल 300 ऑडिशन्स दिले होते. पण कुठेच माझं काम होत नव्हतं. एके रात्री माझ्याकडे खायला फक्त 20 रुपये शिल्लक होते. त्यानंतर सकाळी नाश्त्यासाठीही पैसे नव्हते. लव्हयात्री फ्लॉप झाल्यानंतर जेव्हा अंतिम हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा मला याचं समाधान होतं की कुटुंबीयांना त्यांनी गुंतवलेले पैसे मिळाले. चित्रपटाचे सॅटेलाइट आणि इतर हक्क विकले गेले होते आणि त्यातून बऱ्यापैकी नफा कमावला होता. त्यामुळे माझ्यावर खर्च केलेले पैसे त्यांना परत मिळाले, याचा जास्त आनंद होता.”
आयुषने अर्पिता खानशी 18 नोव्हेंबर 2014 रोजी लग्न केलं. या दोघांना आयात ही मुलगी आणि अहिल हा मुलगा आहे. “जे लोक असा विचार करतात की मी सलमान भाईचे पैसे उडवतो, त्यांना मी हे सांगू इच्छितो की मी कधीच त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत. मी हे स्पष्ट केल्यानंतरही लोक मला ट्रोल करतील. मी खोटं बोलतोय असं म्हणतील. पण आता मला त्या गोष्टींचा फरक पडत नाही. माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे की मी माझ्या मुलांच्या शाळेची फी भरतो, त्यांच्यासाठी चांगलं घर आहे आणि त्यांना मी चांगल्या वातावरणात मोठं करू शकतो”, असं त्याने स्पष्ट केलं.