मुंबई : ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक आणि बिग बॉस 16 चा माजी स्पर्धक अब्दु रोझिक याचं गेल्या काही दिवसांपासून रॅपर एमसी स्टॅनसोबत वाद सुरू आहे. बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅनसोबतची मैत्री संपली, असं वक्तव्य त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलं होतं. एमसी स्टॅन माझे फोन उचलत नाहीये, अशी तक्रार त्याने माध्यमांसमोर केली होती. मात्र या दोघांमध्ये नेमका काय वाद आहे, याविषयी स्पष्ट माहिती कोणालाच नव्हती. आता अब्दुने थेट सोशल मीडिया अकाऊंटविरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. याविषयी त्याच्या टीमकडून ट्विटरवर भलीमोठी पोस्ट लिहिण्यात आली आहे.
10 मार्च रोजी दिग्दर्शक आणि बिग बॉस 16 चा माजी स्पर्धक साजिद खानने अब्दुची भेट घेतली होती. यावेळी त्याने एमसी स्टॅनला कॉल केला होता. मात्र नंतर कॉल करतो असं सांगून त्याने फोन ठेवून दिला. अब्दुने पाठवलेल्या व्हॉइस नोटलाही त्याने काहीच उत्तर दिलं नाही. या घटनेच्या एक दिवसानंतर अब्दु आणि स्टॅन हे बेंगळुरूमध्ये होते. एमसी स्टॅनच्या शोला हजेरी लावून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा अब्दुने त्याच्या मॅनेजरकडे व्यक्त केली होती. मात्र अब्दुने शोच्या ठिकाणी राहू नये, अशी स्टॅनची इच्छा असल्याचं सेक्युरिटी टीम आणि आयोजकांनी सांगितलं.
‘स्टॅनच्या टीमकडून काहीतरी गैरसमज झाला असावा असं समजून अब्दु त्याठिकाणी सामान्य पाहुण्याप्रमाणे तिकिट विकत घेऊन गेला होता. मात्र एमसी स्टॅनच्या मॅनेजमेंट टीमकडून अब्दुला अत्यंत वाईट वागणूक मिळाली. त्यांनी अपशब्द वापरले आणि अब्दुच्या कारचंही नुकसान केलं’, असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलंय.
Strict legal action will be taken against all those specific group of accounts who are bullying & using racist words against #AbduRozik pic.twitter.com/oQHNSBSWv2
— Team Abdu Rozik Official FC ? (@Team_Abdu_Rozik) March 22, 2023
एका म्युझिक कंपनीने अब्दु आणि एमसी स्टॅन यांच्यासोबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र स्टॅनच्या टीमने अब्दुसोबत काम करण्यास नकार दिल्याची तक्रारही या पोस्टमध्ये करण्यात आली. ‘एमसी स्टॅनला अब्दुने जवळचा मित्र मानलं होतं. मात्र त्याच्या अशा वागणुकीमुळे त्याला खूप वाईट वाटलं’, असं त्यात लिहिलंय.
बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅन, अब्दु रोझिक, साजिद खान, शिव ठाकरे, सुंबुल तौकिर खान आणि निमृत कौर आहलुवालिया यांची मंडली होती. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये अब्दुने एमसी स्टॅनच्या आईसोबत फोटो न काढल्यामुळे दोघांमधील शीतयुद्ध सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे.
‘चाहत्यांमधील आणि त्यांच्या आयडॉल्समधील आदर अत्यंत महत्त्वाचा असतो. बॉडी शेमिंग, वर्णभेदी टिप्पणी, उंचीवरून केली जाणारी टिप्पणी आणि अब्दुचा अपमान करणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटविरोधात कारवाई केली जाईल’, असं या पोस्टच्या अखेरीस स्पष्ट करण्यात आलं आहे.