बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. यामुळे अनेकदा ते वादातही अडकतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अभिनेता सलमान खानबद्दल असंच काहीसं वक्तव्य केलंय, ज्याची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. सलमानविषयी बोलताना ते आधी म्हणाले, “प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, सलमान त्या पातळीवर नाही, जिथे मी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. माझे शाहरुख खानसोबत काही व्यावसायिक वाद असतील, पण त्याचा दर्जा पूर्णपणे वेगळा आहे.” या मुलाखतीत अभिजीत यांना सलमानच्या हिट अँड रन प्रकरणाबद्दलही प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नवा वाद निर्माण होण्याचा शक्यता वर्तवली जात आहे.
सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण जेव्हा ताजं होतं, तेव्हा अभिजीत भट्टाचार्य यांनी फुटपाथवर किंवा रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांबद्दल वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. अभिजीत यांची प्रतिक्रिया सलमानला पाठिशी घालणारी होती, असं म्हटलं जात होतं. याविषयी त्यांनी पुन्हा एकदा आपलं बेधडक मत मांडलंय. “मी हेच म्हणालो होतो की जर तुम्ही रस्त्यावर झोपलात, तर अशा गोष्टी घडतीलच. रस्त्यावर लोक कुत्र्यासारखे झोपू लागले तर कोणताही दारुडा किंवा विक्षिप्त माणूस त्यांच्यावर आपली गाडी चालवेल. याचा अर्थ असा नाही की मी सलमानला पाठिंबा देतोय”, असं ते म्हणाले.
28 सप्टेंबर 2002 च्या रात्री वांद्रे परिसरात सलमान खानच्या गाडीनं फुटपाथवरील पाच जणांना चिरडलं होतं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सलमानवर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप होता. पण सलमानने हे आरोप फेटाळले होते. 2015 मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला हिट अँड रनप्रकरणी पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्याचदिवशी संध्याकाळी उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर हायकोर्टानं सलमानच्या पाच वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली.